हंसा कंपनीचाही बेस्टमधून काढता पाय; कंत्राटी तत्त्वावर बस चालविणे शक्य नसल्याची स्पष्टोक्ती

यापुढे या बस चालविणे आपणास शक्य होणार नाही, असे कंपनीने बेस्ट प्रशासनाला स्पष्ट केले आहे.
हंसा कंपनीचाही बेस्टमधून काढता पाय; कंत्राटी तत्त्वावर बस चालविणे शक्य नसल्याची स्पष्टोक्ती
Published on

मुंबई : बेस्ट उपक्रमात भाडेतत्त्वावर सुरू असलेल्या हंसा कंपनीच्या २६२ मिनी एसी बस गाड्यांचे प्रवर्तन १० ऑक्टोबरपासून बंद करण्यात आले आहे. यापुढे या बस चालविणे आपणास शक्य होणार नाही, असे कंपनीने बेस्ट प्रशासनाला स्पष्ट केले आहे. 

कुलाबा येथील बेस्ट भवनमध्ये हंसा कंपनी व बेस्ट प्रशासन यांच्यात बैठक झाली. पण या बैठकीतही कंपनीच्या प्रतिनिधीने आपली भूमिका स्पष्टपणे मांडली. यापुढे भाडेतत्त्वावर बस चालवणे आम्हाला शक्य होणार नाही, असे ते म्हणाले. हंसा कंपनी आणि बेस्टमधील कराराची अंमलबजावणी पुढील काळात करणे शक्य होणार नाही. त्यामुळे बेस्ट व कंत्राटदार यांच्यात झालेला करार लवकरच संपुष्टात आणण्याबाबत कायदेशीर कार्यवाही केली जाईल, असे बेस्टच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

या महिन्याच्या १० तारखेपासून हंसा कंपनीने आपल्या मिडी एसी बसेस चालविण्याचे बंद केले आहे. हंसाच्या २६२ बसेस मरोळ, दिंडोशी व ओशिवरा बस आगारात कार्यरत होत्या. तसेच काही बसेस शिवडी व काळाचौकी परिसरातही धावत होत्या. त्या बंद झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.

५५० बसेस बेस्टच्या ताफ्यातून बाद होणार

बेस्ट उपक्रमात सध्या १०४७ बस आहेत. त्यापैकी ५५० बसेस या डिसेंबर अखेर आयुर्मान पूर्ण झाल्याने ताफ्यातून काढाव्या लागणार आहेत, तर उर्वरित बस ऑक्टोबर २०२६ मध्ये भंगारात जाणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in