
पहाटे अजान झाले नसताना काही अज्ञात व्यक्तींनी हनुमान चालीसा लावल्याचा प्रकार कांदिवली आणि साकीनाका परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद करून पोलिसांनी सहा जणांना आरोपी दाखविले आहे. हनुमान चालीसाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी स्वत:हून कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, स्थानिक पोलिसांनी मशिदीच्या प्रमुखांशी चर्चा करून काही दिवस लाऊडस्पीकरवर अजान करू नये, अशी विनंती केली होती. पोलिसांच्या विनंतीनंतर बुधवारी पहाटेपासून मशिदीत लाऊडस्पीकरवर अजान झालीच नाही. मुंबई शहरात ज्या ठिकाणी मशिदी आहेत, तिथे मंगळवारी रात्री उशिरापासून स्थानिक पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. त्यामुळे दोन गुन्हे वगळता शहरात दिवसभरात कुठलीही अनुचित घटना घडली नाही, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
कांदिवलीतील गणेशनगर परिसरात एक मशीद असून या मशिदीत सकाळी अजान झाली नाही. तरीही काही अंतरावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी हनुमान चालीसा लावली. या घटनेचा एक व्हीडिओ व्हायरल होताच पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविला होता. या घटनेनंतर साकीनाका परिसरात अशाचप्रकारे दुसरी घटना घडली होती.