सीएसएमटी स्थानकात लोकलचा डबा घसरल्याने हार्बर लोकल सेवा विस्कळीत

सीएसएमटी स्थानकातून सकाळी ९.३९ वाजता पनवेलच्या दिशेने निघालेल्या लोकलच्या मागील चौथ्या डब्याची दोन चाके रूळावरून घसरल्याची घटना
सीएसएमटी स्थानकात लोकलचा डबा घसरल्याने हार्बर लोकल सेवा विस्कळीत

सीएसएमटी स्थानकातील फलाट क्रमांक १ वरून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या एका लोकलच्या डब्याची दोन चाके रुळावरून घसरल्याची घटना मंगळवार २६ जुलै रोजी सकाळी ९.३९ वाजता घडली. पनवेल लोकल सीएसएसटी रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक १ वरुन निघत असताना लोकल पुढे जाण्याऐवजी मागे आली आणि ती बफरला धडकली, त्यावेळी या लोकलचा डबा घसरला. दरम्यान, रेल्वे कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम करत तब्ब्ल २ तास ३२ मिनिटांनी म्हणजे दुपारी १२.११ च्या सुमारास फलाट क्रमांक १ वरील लोकल सेवा सुरू करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. या घटनेबाबत रेल्वे अधिकाऱ्यांना विचारले असता या घटनेची सखोल चौकशी करण्यात येईल असे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पावसाळा सुरु झाला की उपनगरीय रेल्वे मार्गावरील रेल्वे बिघाडाचे, अपघातांचे सत्र सुरु होते. रेल्वे प्रशासनाकडून अनेक उपाययोजना केल्याचा दावा करण्यात आला असला तरी विविध घटनांतून हा दावा नेहमी फोल ठरत आला आहे. याची प्रचिती मंगळवारी २६ जुलै रोजी आली. सीएसएमटी स्थानकातून सकाळी ९.३९ वाजता पनवेलच्या दिशेने निघालेल्या लोकलच्या मागील चौथ्या डब्याची दोन चाके रूळावरून घसरल्याची घटना घडली. या लोकलला पुढे जाण्यासाठी सिग्नल मिळाला होता. मात्र ही लोकल पुढे जाण्याऐवजी मागे आली आणि बफरला धडकली. यामुळे लोकल वा बफरचे कोणतेही नुकसान झाले नाही. तर प्रवासीही जखमी झाले नसल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत लोकलचा डबा पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु केले. तब्ब्ल अडीच तासांच्या कामांनंतर हार्बरवरील वाहतूक सुरळीत सुरु करण्यात आली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in