मुंबई : मुंबईच्या सौंदर्यीकरणावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत असताना फुटपाथ, रस्त्यांवर पाळीव कुत्रे घाण करत असल्याचे निदर्शनास आले, तर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. भटक्या कुत्र्यांनी फुटपाथ, रस्त्यांवर घाण केल्यास त्यांच्या मालकांना ५०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. विष्ठा उचलण्यास घाण वाटत असेल तर कुत्र्यांची विष्ठा उचलण्यासाठी स्टीकचा वापर करावा, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर नोव्हेंबर २०२२ पासून मुंबईचे सौंदर्यीकरण करण्यात येत आहे. यासाठी १,७०० कोटी रुपये तरतूद करण्यात आली असून आतापर्यंत ९६५ कामांवर ४५० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मुंबईच्या सौंदर्यीकरणावर मुंबई महापालिका कोट्यवधी रुपये खर्च करत असताना, पाळीव कुत्रे फुटपाथ किंवा रस्त्यांवर घाण करत असल्याचे निदर्शनास आले आहे. फुटपाथ, रस्त्यांवर पाळीव कुत्रे घाण करत असल्यास ५०० रुपये दंड आकारण्यात येतो. मात्र आता दंडात्मक कारवाईची आणखी कठोर अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, पाळीव कुत्रे पाळणाऱ्यांनी कुत्र्यांची विष्ठा उचलण्यासाठी स्टीकचा वापर करावा, असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.