मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीर माफी मागावी - हर्षवर्धन सपकाळ

बंगळुरू येथील मेट्रो स्टेशनच्या नामविस्तारावरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोटे बोलून जनतेची दिशाभूल केली आहे. शिवाजी महाराजांच्या नावाने फडणवीस यांनी माहिती न घेता आपल्या सवयीप्रमाणे खोटे बोलून दिशाभूल केली, त्याबद्दल त्यांनी जनतेची जाहीर माफी मागावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
हर्षवर्धन सपकाळ
हर्षवर्धन सपकाळसंग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : बंगळुरू येथील मेट्रो स्टेशनच्या नामविस्तारावरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोटे बोलून जनतेची दिशाभूल केली आहे. वास्तविक पाहता शिवाजीनगर हे एका परिसराचे नाव असून त्या भागात दोन मेट्रो स्टेशन आहेत. शिवाजी महाराजांच्या नावाने फडणवीस यांनी माहिती न घेता आपल्या सवयीप्रमाणे खोटे बोलून दिशाभूल केली, त्याबद्दल त्यांनी जनतेची जाहीर माफी मागावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, भाजप परिवारानेच सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केलेला आहे. ज्या शिवाजी नगरवरून हा वाद घातला जात आहे तेथे मुस्लिम व अनुसूचित जाती बहुल जनता आहे, त्यांनी कधीही या नावाला विरोध केला नाही किंवा नाव बदला असे म्हटलेले नाही. पण फडणवीस जाणीवपूर्वक खोटे बोलत आहेत, असेही ते म्हणाले.

मुंबई महापालिकेवर ‘दरोडेखोर’...

पावसामुळे मुंबईतली रस्त्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत, पण महानगरपालिका कुठेही काम करताना दिसत नाहीत. मुंबई महापालिकेकडे ९० हजार कोटी रुपयांच्या बँक ठेवी होत्या त्यावर महायुती सरकारने दरोडा टाकला असून वरून १३०० कोटी रुपयांचे कर्ज काढले आहे. महायुती सरकारने महानगरपालिकेवर प्रशासक नाही तर दरोडेखोर बसवला असून मुंबईकरांच्या पैशांची लूट सुरू आहे, याप्रकरणी श्वेतपत्रिका काढा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in