
पूनम पोळ/ मुंबई
मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून फटकारले. यानंतर महापालिका आणि पोलीस यांच्याकडून सध्या रेल्वे स्थानकासह इतर गर्दीच्या ठिकाणांवरील फेरीवाल्यांवर कारवाई सुरू आहे, असा दावा पालिका प्रशासन करत असले तरी मुंबईच्या रस्त्यांवरील परिस्थिती ‘जैसे थे’चीच आहे. भर पावसातही मुंबईच्या रस्त्यांवर फेरीवाले व्यवसाय करताना दिसत आहेत. त्यामुळे नागरिकांना ऐन पावसातही रस्त्यावरून चालताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तर, या फेरीवाल्यांना पालिकेचे कर्मचारी आणि पोलीस जाणूनबुजून पाठीशी घालत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिक देत आहेत.
मागील मे महिन्यापासून मुंबई महापालिका आणि पोलीस प्रशासन यांच्याकडून मुंबईतील फेरीवाल्यांवर कारवाई सुरू असल्याचे पालिकेकडून सांगण्यात येत आहे. रेल्वे स्थानकापासून दीडशे मीटर परिसरात कारवाई करणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र तात्पुरती कारवाई केली जात आहे.
त्यामुळे कारवाईला आलेल्या कर्मचाऱ्यांची पाठ फिरली की हे बेकायदा फेरीवाले पुन्हा आपले बस्तान बसवत आहेत. त्यामुळे मुंबईच्या गर्दीच्या अशा वीस ठिकाणी पूर्वीप्रमाणेच फेरीवाल्यांच्या समस्या कायम आहेत. परिणामी याठिकाणांवर प्रवास करणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होत आहे. दरम्यान, याबाबत फेरीवाल्यांना विचारले असता, साहेब ओळखीचे झाले की धंदा लावायला मिळत असल्याची प्रतिक्रिया छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाबाहेर बसणाऱ्या फेरीवाल्यांनी दिली.
असा केला जातो व्यवसाय
गर्दीच्या ठिकाणी महापालिकेचे कर्मचारी रस्त्याच्या एका बाजूला गाडी उभी करून त्या गाडीच्या बाजूला खेटून फेरीवाल्यांना व्यवसाय करून देतात, असे चित्र मुंबईच्या रस्त्यांवर दिसत आहे. यासंदर्भात दादर स्थानकाबाहेरील फेरीवाल्यांना विचारले असता, त्यांनी पालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवसाचा हप्ता आणि थोड्या वस्तू दिल्यावर कारवाई होत नसल्याची माहिती दिली. दरम्यान, या संदर्भात पालिकेचे उपायुक्त चंदा जाधव यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.