‘त्या’ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सहभागाची चौकशी करा, एसआयटीला हायकोर्टाचा आदेश

पाच वर्षांपूर्वी नालासोपाऱ्यात घडलेल्या कथित बनावट पोलीस चकमकीमागे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा हात होता का? जोगेंद्र राणाला ठार करण्यासाठी...
‘त्या’ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सहभागाची चौकशी करा, एसआयटीला हायकोर्टाचा आदेश

मुंबई : पाच वर्षांपूर्वी नालासोपाऱ्यात घडलेल्या कथित बनावट पोलीस चकमकीमागे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा हात होता का? जोगेंद्र राणाला ठार करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून कुणी आदेश दिले होते का? याचीही चौकशी करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी ठाणे पोलिसांच्या विशेष तपास पथकाला (एसआयटी) दिले.

नालासोपारा येथे २३ जुलै २०१८ रोजी सराईत गुंड जोगेंद्र गोपाल राणा उर्फ गोविंदला स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस मनोज सकपाळ व मंगेश चव्हाण यांनी चकमकीत ठार केले. जोगेंद्रला बनावट चकमकीत मारले, असा दावा करत त्याचा भाऊ सुरेंद्र राणाने अ‍ॅड. दत्ता माने यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

त्या याचिकेवर सोमवारी न्या. रेवती मोहिते-डेरे आणि न्या. मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. या याचिकेची गेल्या आठवड्यातही सुनावणी झाली होती. तेव्हा खंडपीठाने तपासयंत्रणेच्या कार्यपद्धतीवर आसूड ओढले. त्यानंतर अखेर दोन दिवसांपूर्वी शनिवारी एसआयटीने मनोज सकपाळ व मंगेश चव्हाण या दोन्ही पोलिसांना अटक केली. त्यांना ११ मार्चपर्यंत पोलीस कोठडी रवानगी करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त सरकारी वकील प्राजक्ता शिंदे यांनी दिली.

याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. माने यांनी या बनावट चकमकीच्या कटात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा हात होता का, याचीही चौकशी होण्याची गरज आहे. त्यामुळे न्यायालयाने तसा आदेश द्यावा, अशी विनंती केली. खंडपीठाने त्या अनुषंगाने हत्येच्या गुन्ह्याचा सखोल तपास करून नेमका निष्कर्ष काढा, साक्षीदारांचे जबाब नोंदवा, असे आदेश दिले.

logo
marathi.freepressjournal.in