कोणाही व्यक्तीबद्दल त्याने मरावे 
असे बोलू नये- सुप्रिया सुळे.

कोणाही व्यक्तीबद्दल त्याने मरावे असे बोलू नये- सुप्रिया सुळे.

कधीही कोणाच्या वडिलांबद्दल किंवा कोणत्याही व्यक्तिबद्दल त्यांच्या मृत्यूबद्दल बोलू नये, ही आपली संस्कृती नाही, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. केतकी चितळे हिचा निषेध केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे या तिघांचेही त्यांनी जाहीर आभार मानले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळे हिच्याविषयी बोलताना सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली.

“कायदा योग्य ते काम करेल, मी काय बोलणार. एक तरी मी ओळखतही नाही. मात्र कुणाच्याही वडिलांबद्दल किंवा कुठल्याही व्यक्तीबद्दल त्याने मरावे असे कोणी बोलते का? कुठल्या संस्कृतीत हे बसते ? ” असा सवालही त्यांनी यावेळी केला.

"कधीही दुसऱ्या कोणावर जर वेळ आली तर मी स्वत: त्या कृतीच्या विरोधात उभी राहीन. कारण, ही जी विकृती सुरू झालेली आहे, ती समाजासाठी वाईट आहे. आज ती आमच्याबद्दल झाली उद्या ती तुमच्याबद्दल होऊ शकते. अशी जी प्रवृत्ती आहे तिचं कुठल्याही समाजात जगामध्ये कोणी तिचं समर्थन करु शकत नाही.” असेही सुळे यावेळी म्हणाल्या.

पेट्रोल,डिझेल आणि गॅसच्या वाढत्या दराच्या पार्श्वभूमीवर बोलताना त्या म्हणाल्या की, “माझी पंतप्रधानांना विनंती आहे की त्यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत एक बैठक घ्यावी. सगळे राजकारण बाजूला ठेवून आज महागाईवर सगळी राज्ये आणि केंद्र सरकार एक देश म्हणून आपण काय करू शकतो, यावर चर्चा करणे हे आता काळाची गरज आहे. हे मी मागील जवळपास तीन महिने आणि संसदेतील दीड महिन्यातील सगळ्या भाषणात बोलत आहे.” असे त्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in