४० वर्षांपासून फरार आरोपीस अटक

मुंबईहून आग्रा येथे पळून गेलेल्या पापा ऊर्फ दाऊद बंदू खान या ७० वर्षांच्या वयोवृद्ध आरोपीस डी. बी. मार्ग पोलिसांनी अटक केली
४० वर्षांपासून फरार आरोपीस अटक

मुंबई : मुंबईहून आग्रा येथे पळून गेलेल्या पापा ऊर्फ दाऊद बंदू खान या ७० वर्षांच्या वयोवृद्ध आरोपीस डी. बी. मार्ग पोलिसांनी अटक केली. पापावर अपहरणासह बलात्काराचा गुन्हा दाखल असून, जामिनावर बाहेर आल्यानंतर तो गेल्या ४० वर्षांपासून फरार होता. अखेर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले.

ग्रँट रोड येथे राहणाऱ्या पापा खानविरुद्ध ४० वर्षांपूर्वी डी. बी. मार्ग पोलिसांनी अपहरणासह बलात्काराच्या एका गुन्ह्याची नोंद केली होती. याच गुन्ह्यात अटक केल्यानंतर त्याला काही महिन्यांनंतर जामीन मंजूर झाला होता. जामिनावर बाहेर येताच तो त्याच्या मालकीचे घर विकून कुटुंबीयांसोबत पळून गेला होता. खटल्याच्या सुनावणीदरम्यान तो सतत गैरहजर राहत होता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध विशेष सत्र न्यायालयाने स्टँडिंग अजामिनपात्र वॉरंट जारी करून त्याला या गुन्ह्यात फरार आरोपी जाहीर केले होते. त्याच्या अटकेसाठी विशेष मोहीम घेण्याचे आदेशही न्यायालयाने दिले होते. त्याचा शोध सुरू असतानाच पापा खान हा आग्रा येथे राहत असल्याची माहिती पोलीस हवालदार विनोद राणे यांना मिळाली होती. या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय घोरपडे, पोलीस निरीक्षक विलास भोसले यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक संतोष कोयंडे, अंमलदार विनोद राणे, विश्राम महाजन, प्रवीण राठोड आणि सचिन कुमावत यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने पापाला हरिपर्वत, आजम खान घटिया, मोतीलाल नेहरू रोडच्या प्लॉट १६/५३ मधील राहत्या घरातून अटक केली. चौकशीत तो अपहरणासह बलात्काराच्या गुन्ह्यातील वॉण्टेड आरोपी असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्याला ट्रॉन्झिंट रिमांडवर पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले. याच गुन्ह्यात अटक केल्यांनतर त्याला विशेष सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते.

logo
marathi.freepressjournal.in