
मुंबई महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांसाठी लवकरच हेल्थ कार्ड तयार करण्यात येणार आहे. एखाद्या विद्यार्थ्याची आरोग्य तपासणी केल्यानंतर तो डेटा एकत्रित करण्यात येणार असून कुठल्या विद्यार्थ्यांला काही त्रास आहे का, याची सविस्तर माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. पालिका शाळांतील हेल्थ कार्डमुळे तीन लाख विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. शाळा प्रशासन व पालकांना मुलाच्या आरोग्याची माहिती उपलब्ध होईल, अशी माहिती पालिकेचे सह आयुक्त अजित कुंभार यांनी दिली.
मुंबई महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेण्यासाठी येणारे विद्यार्थी यांच्या घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची असते. त्यामुळे पालिका शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना गणवेश, चप्पल, बूट, वह्या, पुस्तके, पाण्याची बॉटल अशा २७ शालेय वस्तूंचे मोफत वाटप करण्यात येते. क्रीडासह अनेक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. पालिका शाळांत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबरोबर आरोग्याची काळजी घेतली जाते; परंतु आता विद्यार्थ्यांना हेल्थ कार्ड तयार करण्यात येत आहे. विद्यार्थ्याची आरोग्य तपासणी केली असता काही त्रास असल्याचे निदर्शनास आले, तर त्या विद्यार्थ्यावर वेळीच उपचार करणे शक्य व्हावे यासाठी हेल्थ कार्ड तयार करण्यात येत आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून याची अंमलबजावणी करण्यात येणार असून डिजिटल हेल्थ कार्ड तयार करण्यासाठी सॉफ्टवेअरची निर्मिती करण्यात येणार आहे.