पावसाळी आजार रोखण्यासाठी आरोग्य विभाग अॅक्शन मोडवर २७ हजारांहून अधिक जणांचे रक्ताचे नमुने घेतले

५११५ ठिकाणी एडीस डासाची ठिकाणे आढळली
पावसाळी आजार रोखण्यासाठी आरोग्य विभाग अॅक्शन मोडवर २७ हजारांहून अधिक जणांचे रक्ताचे नमुने घेतले

मुंबई : मलेरिया, डेंग्यू, लेप्टो, स्वाईन फ्लू, गॅस्ट्रो आदी पावसाळी आजार रोखण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाने २ लाख २२ हजार ५०० घरांना भेटी देत ११ लाख १२ हजार ५०० जणांचे सर्वेक्षण केले. तर २७ हजार ९२३ जणांचे रक्ताचे नमुने घेतले असून तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. मुंबईत झपाट्याने पसरणाऱ्या साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य विभागाने कंबर कसली आहे.

पावसाने पाठ फिरवल्याने जून कोरडा गेला असला तरी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात स्वाईन फ्लूचे ५६, मलेरियाचे २२६, लेप्टोचे ७५, डेंग्यूचे १५७, गॅस्ट्रोचे २०३, कावीळचे ६ आणि चिकनगुनियाचे ९ रुग्ण आढळले आहेत. पावसाळी आजार वाढत असल्यामुळे पालिकेकडून प्रमुख रुग्णालयांसह उपनगरीय रुग्णालयांत तीन हजार बेड तैनात ठेवण्यात आले आहेत. तर पावसाळी आजार टाळण्यासाठी नागरिकांनी घर-परिसर स्वच्छ ठेवावा, पाणी साचू देऊ नये, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नये, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

डेंग्यू, मलेरिया रोखण्यासाठी असे होतेय काम

मलेरिया टाळण्यासाठी अ‍ॅनोफिलीस डासाची उत्पत्तीस्थाने शोधून नष्ट करण्यासाठी ६४९९ घरांची तपासणी करण्यात आली. यामध्ये १७७३३ प्रजनन स्रोतांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ६९१ ठिकाणी मलेरियाचा डास आढळला. किटकनाशक विभागाकडून धुम्रफवारणीही करण्यात येत आहे.

डेंग्यूला आळा घालण्यासाठी एडीस डासाचा शोध घेण्यासाठी ३५२४१६ घरांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ३७४३२७ कंटेनरची तपासणी करण्यात आली. यामध्ये ५११५ ठिकाणी एडीस डासाची ठिकाणे आढळली. ती नष्ट करण्यात आली.

आठवड्याभरात अडीच हजार उंदरांचा नायनाट!

लेप्टोच्या प्रसारास उंदीर कारणीभूत ठरत असल्यामुळे खासगी संस्था आणि पालिका कर्मचार्‍यांच्या माध्यमातून मूषक नियंत्रण मोहीम राबवण्यात येत आहे. यामध्ये आठवडाभरात २५९३ उंदरांचा खात्मा करण्यात आला आहे. यामध्ये विषारी गोळ्या टाकून १६०९ तर पिंजरे लावून ९८४ उंदरांचा खात्मा करण्यात आल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in