
मुंबई : आरोग्य सेवा निरीक्षण प्रणाली, महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी रुग्णालयांमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा शुभारंभ होत असून आता कामगारांसहित सर्वसामान्य जनतेसाठी ही योजना खुली होणार आहे. दरम्यान, सोमवारी जागतिक आरोग्य दिनानिमित्त आरोग्यदायी सुविधांचा शुभारंभ होणार आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र आरोग्य सन्मान २०२५ सोहळा व विविध आरोग्य सेवा योजनांचा शुभारंभ यशवंतराव चव्हाण सेंटर नरिमन पॉइंट येथे होणार आहे.
या कार्यक्रमास विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, कौशल्य, रोजगार, उद्योजगता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते आरोग्य सेवा योजनांचा शुभारंभ होणार आहे.
“आरोग्यदायी सुरुवात, आशादायी भविष्य”
जागतिक आरोग्य दिनानिमित्त जागतिक आरोग्य संघटनेने “आरोग्यदायी सुरुवात, आशादायी भविष्य” हे घोषवाक्य जाहीर केले आहे. या घोषवाक्यानुसार आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून सार्वजनिक आरोग्य विभाग राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी नवीन आरोग्य सेवा योजनांचा शुभारंभ करत आहे.