तापमान बदल, प्रदूषणामुळे खवखव; उपचार करूनही बरे होईना - डॉक्टरांचा अनुभव; मुंबईकर जेरीस

शहरात सध्या सकाळी कडक ऊन व रात्री भयानक थंडी असे विषम तापमान सुरू आहे. या तापमानामुळे मुंबईत कफ, खोकल्याचे रुग्ण वाढत आहेत.
तापमान बदल, प्रदूषणामुळे खवखव; उपचार करूनही बरे होईना - डॉक्टरांचा अनुभव; मुंबईकर जेरीस

स्वप्नील मिश्रा/मुंबई : शहरात सध्या सकाळी कडक ऊन व रात्री भयानक थंडी असे विषम तापमान सुरू आहे. या तापमानामुळे मुंबईत कफ, खोकल्याचे रुग्ण वाढत आहेत. अनेक उपचार करूनही रुग्णांचा आजार कायम असल्याचे दिसून येत आहे.

लालबागला राहणारा समीर चव्हाण या १७ वर्षांच्या मुलाला फेब्रुवारीच्या मध्यापासून खोकल्याचा त्रास सुरू झाला. तो सतत वाढत गेला. त्याला बरे होण्यासाठी डॉक्टरांनी प्रतिजैविकांच्या अनेक मात्रा दिल्या. तसेच त्याच्या छातीचा एक्स-रे काढण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. तेव्हा त्याच्या श्वसनमार्गाच्या वरील भागात संसर्ग झाल्याचे आढळून आले.

गेल्या दोन आठवड्यांपासून दिवस-रात्रीच्या तापमानात मोठे बदल होत आहेत. त्यामुळे अनेकांना खोकल्याशी संबंधित आजार होत आहेत. अनेकांच्या घशाची खवखव वाढली आहे. विशेष म्हणजे या वेळेस आढळणारा खोकला अधिक गंभीर आहे. सध्या कफसिरपने रुग्णांना बरे वाटत नसल्याचे दिसून आले. त्यांना जास्त स्टेराईडची गरज लागत आहे.

सरकारी व खासगी रुग्णालयातील ओपीडीत ४० ते ५० टक्के रुग्ण खोकल्याची तक्रार घेऊन येत आहेत. श्वसनमार्गाच्या वरील भागात संसर्ग व अन्य आरोग्यविषयक तक्रारी निर्माण झाल्या आहेत, असे डॉक्टरांनी सांगितले.

या आजारांना केवळ हवामानातील चढउतारच नाही तर प्रदूषण आणि धुक्याने भरलेल्या हवेतील श्वासोच्छ्वास आणि आरोग्याबाबत लोकांचा निष्काळजीपणा यामुळे दीर्घकाळापर्यंत होणाऱ्या श्वसनाच्या तक्रारी वाढत आहेत, असे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.

जे. जे. रुग्णालयातील डॉक्टर मधुकर गायकवाड म्हणाले की, मुंबईत मी गेली अनेक वर्षे प्रॅक्टीस करत आहे. आतासारखी खराब हवा मी कधीच पाहिली नाही. माझ्या बहुतांशी रुग्णांना दीर्घकाळ चालणाऱ्या खोकल्याचा त्रास सहन करावा लागत आहे. उपचारानंतरही अनेकांना खोकल्याचा त्रास काढावा लागतो तर डॉ. शर्मा म्हणाले की, रोज ओपीडीत सुक्या खोकल्याचे ८ ते १० रुग्ण येत आहेत.

खासगी रुग्णालयातील एका वरिष्ठ आरोग्य डॉक्टरांनी सांगितले की, ८० टक्के रुग्णांना वायू प्रदूषणामुळे त्रास होत असूनही त्यांची लक्षणे कमी आहेत. तथापि, स्पष्ट लक्षणे दिसत नसल्याने खोकल्यावर उपचार करणे आव्हानात्मक बनते, असे त्यांनी सांगितले.

जे. जे. रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले की, न्यूमोनिया व खफ झालेल्या लहान मुलांना आम्ही रुग्णालयात ॲॅडमिट करून घेतले आहे. गेल्या १५ दिवसांत एच३एन२ च्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. अनेक रुग्ण सुक्या खोकल्याची तक्रार करत आहेत. ज्या रुग्णांना फुफ्फुस व हृदयाशी संबंधित आजार आहेत. त्यांची अवस्था आणखीन गंभीर आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासत आहे, असे त्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in