राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हप्रकरणी आजपासून सुनावणी ;सलग तीन दिवस सुनावणी रंगणार

राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिढ्याच्या आतापर्यंत निवडणूक आयोगात तीन सुनावण्या झाल्या आहेत. शेवटची सुनावणी ९ नोव्हेंबरला झाली
राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हप्रकरणी आजपासून सुनावणी ;सलग तीन दिवस सुनावणी रंगणार

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह कोणाला मिळणार, याची नियमीत सुनावणी सोमवारपासून केंद्रीय निवडणूक आयोगात होणार आहे. अजित पवार यांनी २ जुलैला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड पुकारले आणि शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यासोबतच त्यांनी पक्षावरही दावा केला आणि स्वत:ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जाहीर केले. शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही गटांनी पक्ष आणि चिन्हावर दावा सांगितला असल्याने आता निवडणूक आयोग काय निर्णय देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. सोमवारपासून सलग तीन दिवस निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिढ्याच्या आतापर्यंत निवडणूक आयोगात तीन सुनावण्या झाल्या आहेत. शेवटची सुनावणी ९ नोव्हेंबरला झाली. या सुनावणीला शरद पवार स्वत: उपस्थित होते. मात्र काही दिवसांपूर्वीच त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे ते या सुनावणीला हजर राहतील की नाही, याबाबत साशंकताच आहे. गेल्या सुनावणीदरम्यान शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी अजित पवार गटाने बोगस कागदपत्र सादर केल्याचा आरोप केला होता तसेच अजित पवार गटावर कलम ४२० अतंर्गत कारवाईची मागणी केली होती.

अजित पवार गटाने मृत व्यक्ती, अल्पवयीन मुले, गृहिणी, झोमॅटो डिलिव्हरी बॉय, सेल्स मॅनेजर अशा लोकांचे प्रतिज्ञापत्र आयोगाकडे सादर केले आहेत. एकाच व्यक्तीच्या नावाने अनेक प्रतिज्ञापत्र आहेत. त्यामुळे त्यांच्यावर शपथेवर खोटे बोलल्याप्रकरणी भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी अॅड. सिंघवी यांनी केली आहे.

अजित पवार गटाने २० हजार शपथपत्र दाखल केले आहेत. त्यातील ८९०० शपथपत्रे बनावट तथा त्रुटी असलेली त्यांच्या विरोधी पक्षाला आढळली. या त्रुटी आयोगाने मान्यही केल्याचे सिंघवी यांनी सांगितले होते. अजित गटाने दिलेल्या बनावट शपथपत्रांची २४ प्रकारांमध्ये विभागणी केली आहे. त्यावरुन त्यांनी आयोगाची कशी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, हे तपासण्याचे काम होणार आहे. सोमवारपासून आता नियमित सुनावणी होणार असून या कागदपत्रांच्या तपासणीला किती वेळ लागतो, यावरच निकाल केव्हा लागणार हे ठरण्याची शक्यता आहे.

अजितदादा हजर राहणार

निवडणूक आयोगाच्या सुनावणीला आतापर्यंत अजित पवार स्वत: हजर राहिलेले नाहीत. मात्र शरद पवार गटाकडून खुद्द शरद पवार हे पहिल्या सुनावणीला हजर होते. त्यानंतरच्या दुसऱ्या सुनावणीला सुप्रिया सुळे आणि तिसऱ्या सुनावणीला शरद पवार पुन्हा हजर झाले होते. आता शरद पवार या सुनावणीला उपस्थित राहण्याची शक्यता कमी असल्याने तसेच डेंग्यू आजारातून सावरलेले अजित पवार या सुनावणीला उपस्थित राहण्याची दाट शक्यता आहे.

logo
marathi.freepressjournal.in