मुंबईत उष्णतेची लाट; मंगळवारी ३८.७ अंश तापमान

फेब्रुवारी महिना संपत आला असतानाच, मुंबईकरांना उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. रात्रीची थंडी जवळपास गायब झाली असून आता दिवसाची सुरुवात होताच, उन्हाचे चटके बसू लागले आहेत.
मुंबईत उष्णतेची लाट; मंगळवारी ३८.७ अंश तापमान
Published on

देवश्री भुजबळ/मुंबई

फेब्रुवारी महिना संपत आला असतानाच, मुंबईकरांना उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. रात्रीची थंडी जवळपास गायब झाली असून आता दिवसाची सुरुवात होताच, उन्हाचे चटके बसू लागले आहेत. त्यातच मुंबईत दोन दिवसांच्या उष्णतेच्या लाटेचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. मुंबईत मंगळवारी ३८.७ अंश तापमान नोंदवले गेले. सर्वसाधारण तापमानापेक्षा हे तापमान ५.९ अंशाने अधिक आहे.

२०१७ नंतर दुसऱ्यांदा शहरातील तापमानवाढ उच्चांकी पातळीवर नोंदवले गेले आहे. मुंबई, रायगड, पालघर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याने दिला होता. या भागातील तापमान ३७ ते ३९ अंश राहण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. कडक उन्हामुळे नागरिकांनी भरपूर पाणी प्यावे. तसेच उन्हात जास्त बाहेर पडू नये, असा सल्ला भारतीय हवामान खात्याच्या अधिकारी सुषमा नायर यांनी दिला.

त्या म्हणाल्या की, “४८ तासांनंतर तापमान किंचित कमी होऊ शकते. मात्र, उष्ण व आर्द्र हवामान कायम राहील. सर्वसाधारण तापमानापेक्षा किमान ४.५ अंश तापमान असल्यास ती उष्णतेची लाट समजली जाते.”

भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी व सिंधुदुर्गात १ मार्चपर्यंत ‘यलो’ अलर्ट देण्यात आला आहे. या इशाऱ्यानुसार सिंधुदुर्ग जिल्हा वगळून सर्वच भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे, तर २७ फेब्रुवारी रोजी मुंबई, ठाणे व रायगडात उष्णतेचा व दमट हवामानाचा सामना नागरिकांना करावा लागेल.

उष्णतेच्या लाटेपासून असे वाचवा स्वत:ला

भारतीय हवामान खात्याने उष्णतेच्या लाटेपासून वाचण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. नागरिकांनी भरपूर पाणी प्यावे. तसेच सुती कपडे परिधान करावेत. उष्माघाताचा धोका जाणवल्यास तत्काळ जवळच्या रुग्णालयात किंवा डॉक्टरांशी संपर्क साधावा.

मुंबईकरांसाठी फेब्रुवारी महिना ‘उष्ण’

मुंबईकरांसाठी हे वर्ष सामान्य तापमानापेक्षा वाढीव तापमानाने सुरू झाले. जानेवारी महिना हा तिसऱ्या क्रमांकाचा उष्ण महिना ठरला. “फेब्रुवारी महिन्यातील सर्वसाधारण तापमान हे अपेक्षेपेक्षा जास्त राहिले. हा महिना मुंबईकरांसाठी उष्ण ठरला. जागतिक तापमान सामान्य असताना, आता मुंबईकरांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. या कालावधीत कमाल तापमान ३५ ते ३६ अंशाच्या पलीकडे जाण्याची शक्यता आहे,”असे ‘आयएमडी’चे मुंबई संचालक सुनील कांबळे यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in