मुंबईत २७ ते २९ एप्रिलदरम्यान उष्णतेची लाट, हवामान खात्याचा इशारा; 'असा' बचाव करा

गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या झळांनी सर्वसामान्य माणूस कातावलेला असतानाच २७ ते २९ एप्रिलदरम्यान उष्णतेची लाट मुंबई, ठाणे व रायगड जिल्ह्यात येणार आहे...
मुंबईत २७ ते २९ एप्रिलदरम्यान उष्णतेची लाट, हवामान खात्याचा इशारा; 'असा' बचाव करा

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या झळांनी सर्वसामान्य माणूस कातावलेला असतानाच २७ ते २९ एप्रिलदरम्यान उष्णतेची लाट मुंबई, ठाणे व रायगड जिल्ह्यात येणार आहे, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला आहे. यामुळे मुंबईकरांनी सकाळी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांत चक्रीय वातविरोधी स्थिती निर्माण होणार आहे. त्यामुळे २७ ते २९ एप्रिलदरम्यान तापमानात वाढ होऊ शकते, असे हवामान शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी सांगितले.

सध्या एप्रिल महिन्यातच सूर्य आग ओकत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील तीन जिल्ह्यांना पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला. सकाळी ९ ते १० वाजताच दुपारी १२ वाजल्यासारख्या उन्हाचा तडाखा जाणवत आहे. लोकलमध्ये बसणेही अवघड बनले आहे. घरात व घराबाहेर पडल्यानंतर घामाच्या धारा वाहत आहेत. नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईत यापूर्वी १५ व १६ एप्रिलला तापमान वाढ झाली होती. त्यावेळी अनेक ठिकाणी ४१ अंश तापमान झाले होते.

उष्णतेपासून असा बचाव करा

हवामान विभागाने नागरिकांना दीर्घकाळ उन्हात राहू नये. पुरेसे पाणी प्या, सूती कपडे वापरण्याचा सल्ला दिला आहे. दुपारच्या वेळी घराबाहेर पडताना चेहरा झाकून घ्या. टोपी घाला, छत्री वापरा, असा सल्ला दिला आहे.

logo
marathi.freepressjournal.in