मुंबईत आज, उद्या उष्णतेची लाट; दोन दिवस तापमान सामान्याहून जास्त राहणार

मुंबईकरांना आणखी दोन दिवस उष्णतेची लाट सहन करण्याची तयारी ठेवावी लागणार आहे कारण कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.
मुंबईत आज, उद्या उष्णतेची लाट; दोन दिवस
तापमान सामान्याहून जास्त राहणार
फोटो सोै : विजय गोहिल
Published on

देवश्री भुजबळ / मुंबई

मुंबईकरांना आणखी दोन दिवस उष्णतेची लाट सहन करण्याची तयारी ठेवावी लागणार आहे कारण कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने सोमवार, १० व मंगळवार, ११ मार्च असे दोन दिवस उष्णतेची लाट जाहीर केली आहे. १२ दिवसांतली शहरातील ही दुसरी उष्णतेची लाट आहे. मुंबईत २५ आणि २६ फेब्रुवारीला शेवटची उष्णतेची लाट पाहायला मिळाली होती, तेव्हा पारा ३८ अंश सेल्सिअसच्या पुढे गेला होता.

सध्या सुरू असलेल्या उष्णतेच्या लाटेचे कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची अपेक्षा आहे. १२ मार्चपासून पारा खाली येण्याची शक्यता असली तरी, उष्ण आणि आर्द्र हवामानाची स्थिती कायम राहील. भारतीय हवामान विभागाच्या ‘२०२५ समर आऊटलूक’ने मार्च महिन्यात उष्णतेची लाट आणि या सिझनमध्ये सामान्याहून जास्त तापमानाची शक्यता व्यक्त केली आहे.

कोकण क्षेत्रासाठी भारतीय हवामान विभागाने तापमानात २ ते ३ अंश सेल्सियस वाढ होण्याची शक्यता वर्तविली आहे. यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीचा समावेश आहे. "पुढील २-३ दिवसांत कमाल तापमान २ ते ३ अंश सेल्सिअस वाढेल आणि त्यानंतर हळूहळू त्यात घट होईल. पुढील २ ते ३ दिवसांमध्ये कोकणच्या काही भागांत कमाल तापमान ३६ ते ३८ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे, असा अनुमान हवामान खात्याने वर्तविला आहे.

९ मार्चच्या हवामान अहवालानुसार, महाराष्ट्रातील पारा सामान्याहून जास्त होता. उत्तर कोकणमधील कमाल तापमान ३४ ते ३७ अंश सेल्सिअस होते, जे सामान्याहून जास्त होते. दक्षिण कोकणमध्ये कमाल तापमान ३२ ते ३४ अंश सेल्सिअस, उत्तर मध्य महाराष्ट्रात ३६ ते ३८ अंश सेल्सिअस, दक्षिण मध्य महाराष्ट्रात ३३ ते ३९ अंश सेल्सिअस आणि मराठवाड्यात ३६ ते ३८ अंश सेल्सिअस होते- सर्वच क्षेत्रांत सामान्याहून जास्त तापमान होते.

उत्तरेकडील वाऱ्याने उष्णतेत वाढ

हवामान विभागाचे मुंबईचे संचालक सुनील कांबळे म्हणाले, मुंबईत सध्या पूर्व आणि उत्तरेकडून वारे वाहत आहेत. यामुळे दुपारी आणि संध्याकाळी तापमान जास्त आहे. ११ मार्चपर्यंत कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहण्याची अपेक्षा आहे. नागरिकांना उष्ण आणि आर्द्र हवामानामुळे आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे. जनतेने हायड्रेटेड राहणे आणि उष्णतेपासून शक्यतो संपर्क टाळणे आवश्यक आहे.

मुंबईतील वायू गुणवत्ता निर्देशांक (AQI) रविवारी ‘मध्यम’ श्रेणीत होती. (स्त्रोत: केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे रेकॉर्ड्स रविवार संध्याकाळपर्यंत)

बोरिवली ईस्ट – 140

पवई – 117

चेंबूर – 115

घाटकोपर – 111

माझगाव – 108

मालाड वेस्ट – 100

logo
marathi.freepressjournal.in