कारशेडमुळे आरे कॉलनीतील वृक्षसंपदेचे मोठे नुकसान

पुनर्लागवड झाडांचे जगण्याचे प्रमाण कमी; महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण समितीचा निष्कर्ष
कारशेडमुळे आरे कॉलनीतील वृक्षसंपदेचे मोठे नुकसान

मुंबई : विकास कामात अडथळा येत असल्याचा कांगावा करून तोडण्यात आलेल्या वृक्षांची पुनर्लागवड केलेल्या झाडांचे जगण्याचे प्रमाण कमी आहे. मेट्रो-३ च्या कारशेडमुळे आरे कॉलनीतील वृक्षसंपदेचे मोठे नुकसान झाले आहे. सद्यस्थितीत त्या झाडांपैकी केवळ ३० ते ३५ टक्के झाडे जिवंत असल्याचा निष्कर्ष महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरणाच्या समितीने काढला आहे. तसा समितीने सादर केलेल्या अहवालाची गंभीर दखल घेताना न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या समितीने झाडांच्या देखभालीबाबत चिंता व्यक्त केली.

तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर यांच्या खंडपीठाने पुनर्लागवड केलेल्या झाडांच्या देखभालीचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरणाची समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीचे सदस्य अ‍ॅड. एस. पी. चौधरी आणि अ‍ॅड. एम. एच. चंदनशिव यांनी जूनमध्ये केलेल्या झाडांच्या पाहणीचा अहवाल विशेष बैठकीत उच्च न्यायालय समितीचे न्यायमूर्ती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती कोतवाल यांच्यापुढे सादर केला.

५ हजारहून अधिक झाडे एमएमआरसीएलने तोडल्याचा दावा

कुलाबा ते सीप्झदरम्यानच्या मेट्रो-३ प्रकल्पांतर्गत कारशेडचे काम करताना आरे कॉलनीतील हजारो झाडे विस्थापित केली. त्या झाडांच्या संवर्धनाबाबत २०१७ मध्ये उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (एमएमआरसीएल) बेकायदेशीरपणे ५ हजारहून अधिक झाडे तोडल्याचा दावा याचिकेत केला होता.

logo
marathi.freepressjournal.in