राज्यभरात वातावरणात दिवसाआड बदल होताना दिसत आहे. कधी उष्ण, कधी दमट तर कधी अचानक पावसामुळे ऋतुचक्र पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अशातच मंगळवार ११ ऑक्टोबर रोजी नवी मुंबई, ठाणे, कल्याण शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांचा चांगलाच गोंधळ उडाला. तर मुंबईसह उपनगरात पुढील काही तास मुसळधार पाऊस होईल असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. दरम्यान, दुपारनंतर कामावरून घरी जाण्याच्या वेळेत पाऊस सुरू झाल्याने मुंबईत चाकरमान्यांची तारांबळ उडाली. तर ट्रान्स हार्बर रेल्वे सेवा आणि हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा पावसामुळे ५ ते ६ मिनिटे उशिराने धावत होती.