मुंबईत मान्सून दाखल! रत्नागिरी, सिंधुदुर्गात मुसळधार; पुढील दोन दिवस मुंबईसह राज्यात जलधारा

घामाच्या धारा व प्रचंड उकाड्याने हैराण झालेले मुंबईकर ज्याची चातकाप्रमाणे वाट पहात होते, त्या मान्सूनची प्रतीक्षा अखेर संपली. कोकण पट्ट्यात डेरेदाखल झालेल्या मान्सूनने मुंबईत दोन दिवस आधीच एंट्री केली आहे.
मुंबईत मान्सून दाखल! रत्नागिरी, सिंधुदुर्गात मुसळधार; पुढील दोन दिवस मुंबईसह राज्यात जलधारा
Published on

मुंबई : घामाच्या धारा व प्रचंड उकाड्याने हैराण झालेले मुंबईकर ज्याची चातकाप्रमाणे वाट पहात होते, त्या मान्सूनची प्रतीक्षा अखेर संपली. कोकण पट्ट्यात डेरेदाखल झालेल्या मान्सूनने मुंबईत दोन दिवस आधीच एंट्री केली आहे. त्यामुळे उष्म्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, कोकण पट्ट्यात रत्नागिरी, सिंधुदुर्गात पावसाची धुवांधार इनिंग सुरू असून पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाल्याने मुंबईसह राज्यात पुढील दोन दिवस जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता कुलाबा हवामान विभागाने वर्तवली आहे.

यंदा उष्णतेच्या लाटेमुळे लोकांचा चांगलाच घामटा निघाला. पाऊस कधी बरसणार याकडे प्रत्येक जण चातकासारखी वाट बघत होता. अखेर चार दिवसांपूर्वी कोकण पट्ट्यात मान्सून दाखल झाला आणि कोकण पट्ट्यात रत्नागिरी, कुडाळ, सिंधुदुर्गात पावसाची सध्या दमदार इनिंग सुरू आहे. पुढील काही दिवस पावसाचा जोर असाच कायम राहणार आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे, तर मुंबईत रविवार ते मंगळवारपर्यंत पावसाचा अंदाज लक्षात घेता मुंबईसाठी 'यलो अलर्ट' जारी केल्याचे कुलाबा हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी सांगितले. दरम्यान, मुंबईत मंगळवारपर्यंत पावसाच्या जोरदार सरी बरसण्याची शक्यता असून मंगळवारनंतर अधूनमधून जोरदार सरी बरसतील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, रविवारी मुंबईतील सांताक्रुझ येथे ०.२ मिमी, तर कुलाबा येथे ०.२ मिमी पावसाची नोंद झाली.

राज्यात पावसाचा विस्तार

ठाणे, मुंबई, पालघर, रायगड या भागात पावसाची एंट्री झाली आहे, तर जळगाव, धुळे, कोल्हापूर, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव या जिल्ह्यात पुढील ४८ तासांसाठी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे आणि नगर या भागात काही ठिकाणी रिमझिम पाऊस बरसेल.

logo
marathi.freepressjournal.in