मुंबई, ठाण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस; परतीच्या पावसासाठी वातावरण अनुकूल

हवामान खात्याने मुंबई आणि कोकण किनारपट्टीच्या परिसरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली होती
मुंबई, ठाण्यात विजांच्या कडकडाटासह  मुसळधार पाऊस; परतीच्या पावसासाठी वातावरण अनुकूल
Published on

गेल्या काही दिवसांपासून अधूनमधून दर्शन देणाऱ्या वरुणराजाने बुधवारी संध्याकाळी दमदार हजेरी लावल्याने नोकरीवरून घरी जाणाऱ्या कामगारवर्गाची तारांबळ उडाली. भारतीय हवामान विभागाने पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिल्यानंतर बुधवारीच मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बरसला. मुंबई, ठाणे, वसई, पालघर, कल्याण-डोंबिवली या जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढल्यामुळे अवघ्या काही तासांतच काही ठिकाणी गुडघाभर पाणी साचले होते. परतीच्या पावसासाठी वातावरण अनुकूल असल्याने पुढील काही दिवस विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याने मुंबई आणि कोकण किनारपट्टीच्या परिसरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसरात बुधवारी संध्याकाळी ५ वाजल्यापासून आकाशात काळे ढग दाटून आले. त्यामुळे सूर्यास्ताआधीच अंधार दाटून आला होता. त्यानंतर विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे कार्यालयातून घरी जाण्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांची भंबेरी उडाली. अनेकांकडे छत्र्या, रेनकोट नसल्यामुळे त्यांनी भिजतच आपले घर गाठणे पसंत केले. अरबी समुद्रामध्ये मान्सून पुन्हा सक्रिय होत असून, वाऱ्यांची क्षमता सध्या मध्यम ते तीव्र आहे. मान्सून ट्रफचा पूर्वेकडील भाग दक्षिण दिशेने सरकण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली. यासोबतच कर्नाटकच्या दक्षिणेकडे चक्रीय वातस्थिती निर्माण झाली आहे. बुधवारी बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीय वातस्थिती निर्माण होऊ शकते.

ठाण्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस

ठाण्यात बुधवारी सायंकाळपासून विजांचा कडकडाट आणि वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ठाणे जिल्ह्यात अंधार पसरला. संध्याकाळी एका तासात ३२.५१ मिमी पावसाची नोंद पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने केली आहे. तासभर पडलेल्या पावसामुळे शहरातील नितीन कंपनी, वंदना सिनेमा, पाचपाखाडी, तसेच पालिका मुख्यालय परिसर या ठिकाणच्या सखल भागात पाणी साचले. अचानक पडलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचले. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, कामावरून घरी परतणाऱ्या नोकरदारांचे हाल झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. तासाभराने पावसाचा जोर ओसरला. अचानक आलेल्या या पावसामुळे परिसरातील वातावरणात थंडावा पसरलेला असून गरमीने हैराण झालेल्या नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे.

अनंत चतुर्दशीला अतिमुसळधार पाऊस

अनंत चतुर्दशीला म्हणजेच शुक्रवारी राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड येथेही शुक्रवारी पावसाचा जोर वाढू शकतो. चंद्रपूर, गडचिरोली येथे ऑरेंज अॅलर्टही जारी करण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in