मुंबई : छायाचित्रकार हेमा उपाध्याय व त्यांचे वकील हरीश भंबानी हत्याकांडात दोषी ठरविण्यात आलेला मुख्य आरोपी चित्रकार चिंतन उपाध्यायसह अन्य तिघा आरोपींना दिंडोशी सत्र न्यायालयाने मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. व्ही. भोसले यांनी ही शिक्षा सुनावताना चिंतनला २५ हजारांचा दंड ही ठोठावला.
न्यायालयाने आरोपींना दोषी ठरविल्यानंतर शिक्षेबाबतचे आपले म्हणणे न्यायालयात मांडताना चिंतन याने, माझे मन शुद्ध असून, मी कोणताही गुन्हा केलेला नाही. मी निर्दोष आहे. असे असले तरी आपण दयेची याचना करणार नाही. न्यायालयाने आपल्याला दोषी ठरवले आहे त्यामुळे, न्यायालय जी शिक्षा सुनावेल, ती स्वीकारण्यास आपण तयार असल्याचे स्पष्ट केले होते.
तर सरकारी पक्षाने आरोपींनी शांत डोक्याने हत्येचा कट रचून तो अंमलात आणला आहे. या दुहेरी हत्याकांडाने समाजात हादरला होता. तसेच समाजाचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ असलेल्या वकिलावर आरोपींनी हल्ला केला. त्यामुळे, अशा हल्ल्याची गांभीर्याने दखल घेतली जाते हा संदेश समाजा पर्यंत पोहचवायचा असेल, तर चिंतन याच्यासह दोषी ठरविण्यात आलेल्या अन्य तीन आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्याची मागणी केली होती, तर चिंतन याला हत्येच्या कटात सहभागी असल्याबाबत दोषी ठरवण्यात आले आहे. त्याने प्रत्यक्ष हत्या केलेली नाही किंवा त्याच्याशी तो संबंधितही नाही. त्याचप्रमाणे, हे प्रकरण कोणत्याही प्रकारे दुर्मीळातील दुर्मीळ प्रकारात मोडत नाही. त्यामुळे, चिंतनसह अन्य आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली जाऊ शकत नाही, असा दावा आरोपींच्या वतीने करण्यात आला होता. चिंतनवगळता अन्य आरोपींनी शिक्षेत दया दाखवण्याची मागणी केली होती.
वैवाहिक वादातून हत्येचा कट रचला
दुहेरी हत्याकांड घडून आठ वर्षे उलटल्यानंतर खटल्याची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. व्ही. भोसले यांनी चार दिवसापूर्वी या हत्याकांडात चिंतन उपाध्यायने वैवाहिक वादातून दुहेरी हत्याकांडाचा कट रचल्याचा, तर विजय राजभर, प्रदीप राजभर व शिवकुमार राजभर या तिघांना हत्या, पुरावे नष्ट करणे आदी गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवले होते.