

मुंबई : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा यंदाचा बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांना जाहीर झाला आहे. आचार्य अत्रे स्मृती पत्रकारिता पुरस्कार पत्रकार प्रशांत कदम यांना, तर हिंदी पत्रकारितेतील भीष्माचार्य बाबुराव पराडकर पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार अनुराग त्रिपाठी यांना प्रदान करण्यात येणार आहे.
पुरस्कारांचे वितरण शनिवार, १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरच्या रंगस्वर सभागृहात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. परिषदेचे अध्यक्ष शिवराज काटकर यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली.
सावित्रीबाई फुले पत्रकारिता पुरस्कार जान्हवी मुळे, दत्ताजीराव तटकरे स्मृती पत्रकारिता पुरस्कार सचिन परब, स्वातंत्र्यसेनानी मनोहरपंत चिवटे आरोग्य पत्रकारिता पुरस्कार संतोष आंधळे, स्वातंत्र्यसैनिक माणिकराव देशमुख देवडीकर कृषी पत्रकारिता पुरस्कार ‘सकाळ’चे सुनील पाटील आणि भगवंतराव इंगळे स्मृती पत्रकारिता पुरस्कार अविनाश महालक्ष्मे यांना जाहीर झाला आहे. नागोजीराव ऊर्फ अण्णासाहेब दुधगावकर स्मृती पत्रकारिता पुरस्कार अभय देशपांडे यांना, प्रमोद भागवत स्मृती शोध पत्रकारिता पुरस्कार ‘न्यूज १८ लोकमत’चे पत्रकार महेश तिवारी यांना, तर संतोष पवार स्मृती पत्रकारिता पुरस्कार ‘ग्रामोद्धार’चे संपादक बापूसाहेब जाधव यांना प्रदान करण्यात येणार आहे.
पुरस्कार सोहळ्याला पत्रकार आणि नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन परिषदेचे अध्यक्ष शिवराज काटकर यांच्यासह विश्वस्त शरद पाबळे, किरण नाईक, मुंबई शाखेचे अध्यक्ष राजा आदाटे, मुंबई अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष दीपक कैतके, डिजिटल मीडिया परिषदेचे अनिल वाघमारे, मुंबईचे अध्यक्ष मनोज भोईर, परिषदेचे माजी अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, माजी सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, मन्सूरभाई शेख आणि महिला आघाडीप्रमुख शोभा जयपूरकर यांनी केले आहे.