फोर्ट परिसरातील पुरातन वास्तूंना नवा लूक इमारती, हॉर्निमन सर्कल, पदपथांची हेरिटेज दुरूस्ती

पालिका पाच कोटी रुपये खर्चणार
फोर्ट परिसरातील पुरातन वास्तूंना नवा लूक इमारती, हॉर्निमन सर्कल, पदपथांची हेरिटेज दुरूस्ती

मुंबई : मुंबईतील ए वॉर्ड फोर्ट परिसरातील हेरिटेज इमारती, वास्तू, कलाकृती केलेली बांधकामे मुंबईकरांसह पर्यटकांचे आकर्षण आहे. आता फोर्ट परिसरातील या हेरिटेज वास्तुंना नवा लूक मिळणार आहे. हेरिटेज इमारती, हॉर्निमन सर्कल, या परिसरातील पदपथांची दुरूस्ती करणार आहे. हेरिटेज वास्तू, कलाकृतींचे जतन करण्यासाठी मुंबई महापालिकेने पुढाकार घेतला आहे. यासाठी पालिका पाच कोटींहून अधिक खर्चणार आहे.

फोर्ट भागात पालिकेच्या मालकीच्या तसेच खासगी व्यक्ती, ट्रस्टच्या असंख्य इमारती आणि वास्तू आहेत. ब्रिटीशकालीन असंख्य वास्तूंना हेरिटेज दर्जा मिळाला आहे. त्याचे जतन करण्याची जबाबदारी पालिकेच्या हेरिटेज विभागावर सोपवण्यात आली आहे. यासाठी पालिकेने विविध वारसा वास्तू सुधारणा नागरी आराखडा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पा अंतर्गत फोर्ट येथील महात्मा गांधी मार्गावरील पुरातन इमारतींचे सौंदर्य पर्यटकांच्या नजरेस पडावे यासाठी इमारतींच्या समोरील बस थांबे हलवणे, अतिक्रमण हटवणे ही कामे केली जात आहेत. काळा घोडा, जहांगीर आर्ट गॅलरी परिसरात याकरिता पारदर्शक काचांचे नवीन बस थांबे बसविण्यात आले आहेत. तसेच या भागातील पदपथांचे पुरातन सौंदर्य कायम राहण्याच्या दृष्टिकोनातून कामे केली जात आहेत.

'असे' होणार काम!

एशियाटिक लायब्ररीसमोरील शहीद भगतसिंग रस्त्यालगत असलेल्या हॉर्निमन सर्कल उद्यानाचे तसेच त्याच्या ओतीव लोखंडाच्या कुंपण भिंतीचे संवर्धन व जतन करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तसेच बागेतील वाटांची दुरूस्ती, कारंज्याचे नूतनीकरण, पाणपोई, आसन व्यवस्था, विजेचे नवे हेरिटेज स्वरूपाचे खांब यासह विविध कामे केली जाणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in