मुंबई : केरळात झालेल्या बॉम्बस्फोटानंतर मुंबईत हायअलर्ट देण्यात आला आहे. मुंबईतील ज्यूंच्या धार्मिक स्थळांवर सुरक्षव्यवस्था कडक केली असून इस्त्रायल-हमास आदींशी संबंधित कार्यक्रमांवर पोलिसांचे बारीक लक्ष आहे. सुरक्षा यंत्रणांना विशेष उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.
केरळातील एर्नाकुलम येथील कलमसारी येथील ख्रिश्चनांच्या धार्मिक स्थळावर रविवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास साखळी स्फोट झाले. यात एक महिला ठार तर ३६ जण जखमी झाले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, केरळातील बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर विशेष सुरक्षा उपाययोजना हाती घेतल्या आहेत. गेले काही दिवस वानखेडे स्टेडीयमवर विश्वचषकाचे सामने खेळले जात आहेत. हे स्टेडीयम मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते. त्यामुळे कोणताही अनुचीत प्रकार घडू नये, म्हणून मुंबई पोलिसांनी वानखेडे स्टेडियमला कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे.
मुंबईतील संवेदनशील व अतिसंवेदनशील भागात पोलिसांची सुरक्षा कायमच असते. केरळ स्फोटानंतर मुंबई पोलिस ॲॅलर्टवर आले आहेत. संवेदनशील व अतिसंवेदनशील भागात पोलिसांनी गस्त वाढवली आहे. तसेच पोलिसांनी संशयितांची चौकशी सुरू केली आहे.