

मुंबई : जागतिक फादर्स डेच्या निमित्ताने (२१ जून) एपेक्स ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सने मुंबईकरांना आपल्या वडिलांच्या आरोग्याकडे अधिक गांभीर्याने लक्ष देण्याचे आवाहन केले आहे. वाढते ताण, कामाचे आर्थिक जबाबदाऱ्या, कौटुंबिक अपेक्षा आणि बदलती जीवनशैली यामुळे आजचा पिता सतत मानसिक तणावाखाली जगत असून त्याचा थेट परिणाम उच्च
रक्तदाब आणि हृदयविकारांच्या वाढत्या धोक्यावर होत आहे. कुटुंबासाठी आयुष्यभर कष्ट करणारे अनेक वडील स्वतःच्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करतात. नियमित आरोग्य तपासणी टाळणे, वाढलेला रक्तदाब गांभीर्याने न घेणे आणि आजाराची लक्षणे दुर्लक्षित करणे यामुळे पुढे हृदयविकाराचा झटका, मेंदूचा स्ट्रोक किंवा मूत्रपिंडाच्या गंभीर आजारांचा धोका वाढतो.
अशी काळजी घ्या!
३० वर्षांनंतर प्रत्येक पुरुषाने नियमित रक्तदाब तपासणी करणे आवश्यक आहे. संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप, तंबाखू आणि मद्यपानापासून दूर राहणे तसेच मानसिक ताण कमी करण्यासाठी वेळ देणे गरजेचे आहे. मानसिक आरोग्याबद्दल मोकळेपणाने बोलणे ही कमजोरी नसून जबाबदारपणाची निशाणी आहे, असे डॉ. चिराग शाह म्हणाले.
आत्महत्यांमध्ये मध्यमवयीन पुरुषांचा समावेश
राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या (एनसीआरबी) आकडेवारीनुसार २०२४ मध्ये देशात १.७० लाखांहून अधिक आत्महत्या झाल्या असून त्यापैकी जवळपास तीन चतुर्थांश मृत्यू पुरुषांचे होते. विशेष म्हणजे ३० ते ५० वयोगटातील पुरुषांमध्ये ही संख्या लक्षणीय आहे. तज्ज्ञांच्या मते दीर्घकाळाचा ताण, मानसिक दडपण आणि आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष यामुळे शारीरिक तसेच मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.
आजचा पिता आपल्या कुटुंबासाठी सतत धावत असतो. कामाचा ताण, आर्थिक जबाबदाऱ्या आणि भविष्यातील चिंता यामुळे अनेक पुरुष स्वतःच्या आरोग्याला वेळ देत नाहीत. उच्च रक्तदाब हा 'सायलेंट किलर' म्हणून ओळखला जातो, कारण सुरुवातीच्या टप्प्यात त्याची लक्षणे दिसत नाहीत. अनेकदा हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक आल्यानंतरच त्याचे गांभीर्य लक्षात येते.
डॉ. चिराग शाह, एपेक्स ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सचे क्रिटिकल केअर आणि हायपरटेन्शन मॅनेजमेंट तज्ज्ञ