
मुंबई : एका १५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक केलेल्या आरोपीला उच्च न्यायालयाने दिलासा देत जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांनी पीडित मुलीला ती काय करीत आहे याचा अर्थ जाणून घेण्याचे पूर्ण ज्ञान आणि क्षमता असूनही तिने स्वेच्छेने आरोपी तरुणाशी संबंध ठेवले, असे निरीक्षण नोंदवून याच आधारे आरोपीला जामिनावर सोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.
पीडित मुलीच्या कुटुंबीयांना त्यांच्या मुलीचे २५ वर्षांच्या तरुणाशी असलेल्या संबंधांची माहिती होती. ही वस्तुस्थिती न्यायालयाने गांभीर्याने विचारात घेतली. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्याचा खटला नजीकच्या भविष्यात सुरू होण्याची किंवा संपण्याची शक्यता नाही. तसेच आरोपी तरुणाने मागील तीन वर्षे ११ महिने तुरुंगवास भोगला आहे. अशा परिस्थितीत आरोपी तरुण जामीन मिळवण्यास पात्र आहे, असेही न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या एकलपीठाने जामीन अर्ज मंजूर करताना नमूद केले.
आरोपी तरुणाला मे २०२१ मध्ये अटक करण्यात आली होती. त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पोक्सो) कायद्याच्या तरतुदींनुसार अपहरण आणि बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांत केलेल्या तक्रारीनुसार जुलै २०२० मध्ये मुलगी घरातून निघून गेली आणि परत आली नाही. आरोपीशी तिचे संबंध असल्याचा संशय आल्याने पीडितेच्या वडिलांनी आरोपीला मुलीच्या ठावठिकाणाबद्दल विचारले. त्याने आपल्याला काहीही कल्पना नसल्याचे सांगितले होते.
दोन दिवसांनंतर मुलीने वडिलांना फोन कॉल करून स्वतःच्या ठावठिकाणाबद्दल माहिती दिली. मे २०२१ मध्ये मुलीने वडिलांना तिच्या गरोदरपणाबद्दल सांगितले. याचदरम्यान आरोपीने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला.