

मुंबई : नाईट क्लबमधील गर्भवती कर्मचाऱ्याला मद्यधुंद अवस्थेत पोटात मारहाण करून गर्भपात केल्याचा आरोप असलेल्या आरोपीला उच्च न्यायालयाने दणका दिला. हा गुन्हा गंभीर आहे. महिलेने तिचे मूल गमावले आणि सत्र न्यायालयाने गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेतले नाही, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने दिंडोशी सत्र न्यायालयाचा जामीन मंजूर करण्याचा आदेश रद्द केला.
न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या एकलपीठाने दिंडोशी सत्र न्यायालयाचे निष्कर्षदेखील रद्द केले. आरोपीला दहा दिवसांपूर्वी अटकेचे कारण दिले नव्हते, या आधारावर दिंडोशी सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. आरोपी आणि त्याच्या वडिलांना अटकेचे लेखी कारण कळवले नसल्याच्या मुद्द्यावर जामीन मंजूर करताना सत्र न्यायालयाने महत्त्वपूर्ण पुरावे दुर्लक्षित केले आणि कायदेशीर तरतुदींचा चुकीचा अर्थ लावला, असे न्यायमूर्ती गोखले यांनी म्हटले आहे.
याबाबतची वस्तुस्थिती गंभीर असल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले आणि आरोपी रिदम गोयलचा जामीन मंजूर करण्याचा सत्र न्यायालयाचा आदेश रद्द केला. मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेले हे २५ नोव्हेंबर २०२५ रोजीचे प्रकरण आहे.
प्रकरण काय?
नाईट क्लबमध्ये गेस्ट रिलेशन मॅनेजर म्हणून काम करणारी अमरीना मॅथ्यू फर्नांडिस आठ आठवड्यांची गर्भवती होती. २५ नोव्हेंबर रोजी रात्री १.३० वाजता ती तिची शिफ्ट पूर्ण करून नाईट क्लबमधून बाहेर पडत असताना आरोपी रिदम अरविंद गोयल आणि त्याच्या साथीदारांनी दारू पिऊन तिच्या पोटावर मारहाण केली. तसेच गोयल त्याच्या मित्रांसह लिफ्टमध्ये घुसला आणि तिला त्रास देऊ लागला. यादरम्यान पीडितेने स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी तिच्या नाकावर देखील मुक्का मारला. तिने गर्भवती असल्याचे सांगून तिला इजा करू नका, अशी विनंती केली. तथापि, गोयलने थेट तिच्या पोटात मुक्का मारला. हा हल्ला इतका गंभीर होता की लिफ्ट तळमजल्यावर पोहोचली आणि बाउन्सर तिला वाचवण्यासाठी आले. तिच्या डोक्यातून आणि गुप्तांगातून रक्तस्त्राव होत होता. तिला दुखापत झाली होती. नंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले. तिथे तिला गर्भपात झाल्याची माहिती देण्यात आली.