

मुंबई : लग्न कुणासोबत करायचे, कुणासोबत राहायचे हा सज्ञान व्यक्तीच्या पसंतीचा विषय आहे. याबाबत स्वतःचा निर्णय घेण्यास त्या सज्ञान व्यक्तीला स्वातंत्र्य आहे, असे स्पष्ट मत व्यक्त करत न्या. सारंग कोतवाल आणि न्या. श्याम चांडक यांच्या खंडपीठाने मुलीच्या पित्याची याचिका फेटाळली.
प्रेमविवाह करण्यासाठी घर सोडलेल्या मुलीला पोलिसांमार्फत हजर करण्याची विनंती पित्याने याचिकेद्वारे केली होती.
अल्पसंख्याक समुदायातील ३१ वर्षीय तरुणीला महाराष्ट्राबाहेर ती मित्रासोबत राहत असलेल्या ठिकाणी परत पाठवण्याचे निर्देश न्यायालयाने वाकोला पोलिस अधिकाऱ्यांना दिले. तरुणीला तिच्या वेगळ्या धर्मातील मित्राशी लग्न करायचे होते. मात्र त्या लग्नाला तिच्या कुटुंबियांनी विरोध केला आणि तिने घर सोडले. याचदरम्यान मुलीच्या पित्याने हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली. त्याला अनुसरून ती तरुणी न्यायालयात हजर झाली होती. याचवेळी न्या. सारंग कोतवाल आणि न्या. श्याम चांडक यांच्या खंडपीठाने मुलगी प्रौढ असल्यामुळे स्वतःचे निर्णय घेण्याचे तिला स्वातंत्र्य असल्याचे निरिक्षण नोंदवले.
मुलगी १८ एप्रिल रोजी बेपत्ता झाल्यानंतर पित्याने वाकोला पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. ३ ऑक्टोबर रोजी त्यांच्या वकिलाने मुलीच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केली होती. सुनावणीदरम्यान सरकारी वकिलांनी वाकोला पोलीस ठाण्यातून मिळवलेला मुलीचा व्हिडिओ सादर केला. त्यावर मुलीच्या पित्याच्या वकिलांनी ती मुलगी कदाचित दबावाखाली विधाने करत असेल, असा युक्तीवाद केला.