

मुंबई : पाच वर्षांपूर्वी रस्ते अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाच्या आईला १.३ कोटी रुपयांची नुकसानभरपाई मंजूर करण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला. मृत दुचाकीचालकाने हेल्मेट घातले नव्हते याकडे लक्ष वेधत नॅशनल इन्शुरन्स कंपनीने नुकसानभरपाई देण्यास नकार दिला होता. हेल्मेट घातले नव्हते, या कारणावरून तरुणाच्या कुटुंबीयांना भरपाई नाकारता येणार नाही, असे स्पष्ट करीत न्यायालयाने विमा कंपनीची याचिका फेटाळली आणि मृत तरुणाच्या आईला भरपाईचा दिलासा दिला.
मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने मृत तरुणाच्या आईला नुकसानभरपाई मंजूर केली होती. त्या निर्णयाला विमा कंपनीने न्यायालयात आव्हान दिले होते. कंपनीच्या अपिलावर न्यायमूर्ती एम. एस. सोनक यांच्या एकलपीठाने सुनावणी झाली. अपघाती मृत्यू झालेल्या तरुणाने हेल्मेट परिधान केले नव्हते. मात्र तरुणाचा मृत्यू हेल्मेट न घातल्यामुळे झाल्याचे कुठेही आढळून आलेले नाही. विमा कंपनीचा दावा मान्य करता येणार नाही, असे न्यायमूर्ती सोनक यांनी म्हटले आणि नुकसानभरपाई मंजूर करण्याचा मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाचा निर्णय कायम ठेवला होता. भरपाईसाठी दाद मागितलेल्या महिलेचा मुलगा स्कूटी चालवत होता. त्यावेळी क्वालिसच्या धडकेत मुलाचा मृत्यू झाला होता.