
मुंबई : झी टीव्हीवरील 'तुम से तुम तक' या टीव्ही मालिकेविरुद्ध दाखल झालेल्या एफआयआरमध्ये तक्रारदार म्हणून एका ठगाला न्यायालयापुढे हजर करणाऱ्या सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांना उच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले. न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंड पीठाने तुमचा हा प्रताप पाहून आम्ही अस्वस्थ झालो आहोत, अशी संतप्त टिप्पणी करत न्यायालयाने नोडल सायबर पोलिस स्टेशनचे निरीक्षक प्रफुल्ल वाघ यांच्या वर्तणुकीवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
एफआयआरनुसार तक्रारदार सुनील शर्मा यांनी, ५० वर्षांचा पुरुष २० वर्षांच्या तरुणीच्या प्रेमात पडल्याची कथा असलेल्या मालिकेच्या प्रसारणामुळे आपल्या भावना दुखावल्याचे म्हटले आहे. तसेच सायबर गुन्हे पोलिसांनी ३ जुलै रोजी शोच्या निर्मात्यांना तक्रारीवरील चौकशी बंद केल्यासंदर्भात पत्र पाठवले होते. जेव्हा एका पोलिस अधिकाऱ्याने तक्रारदार सुनील शर्मा यांनी तक्रारीत माहिती दिलेल्या घरी वैयक्तिक भेट दिली, तेव्हा तेथील सुरक्षा रक्षकाने तशा नावाचा कोणताही व्यक्ती तिथे राहत नसल्याचे सांगितले.
याचवेळी मूळ तक्रारदाराच्या जागी दुसऱ्या ठगाला न्यायालयात हजर केल्याप्रकरणी नोडल सायबर पोलिस स्टेशनचे निरीक्षक प्रफुल्ल वाघ यांना धारेवर धरले. झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेडसंबंधित खटल्यात तक्रारदार म्हणून भामट्याला न्यायालयात हजर करणे हा प्रकार आम्हाला अस्वस्थ करणारा आहे, अशा शब्दांत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.