भाजप आमदार तमिळ सेल्वन यांना हायकोर्टाचा दिलासा ;सहा महिन्यांच्या शिक्षेला स्थगिती

या याचिकेवर न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी सेल्वन यांच्या वतीने सत्र न्यायालयाच्या शिक्षेलाच आक्षेप घेतला.
भाजप आमदार तमिळ सेल्वन यांना हायकोर्टाचा दिलासा ;सहा महिन्यांच्या शिक्षेला स्थगिती
PM

मुंबई : महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना मारहाण केल्याच्या आरोपाप्रकरणी सत्र न्यायालयाने शिक्षा ठोठावलेले भाजप आमदार कॅप्टन आर. तमिळ सेल्वन यांना मुंबई हायकोर्टाने मंगळवारी मोठा दिलासा दिला. न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांनी आमदार सेल्वन यांच्या शिक्षेला स्थगिती देत १५ हजार रुपयांचा अंतरिम जामीन मंजूर केला.

गुरूतेग बहादूर नगर (जीटीबी) येथील २५ इमारतींचा बेकायदा वीज व पाणीपुरवठा खंडित करण्यासाठी गेलेल्या पालिकेच्या अधिकाऱ्यांना मारहाण केल्याच्या आरोपाप्रकरणी तमिळ सेल्वन यांना ऑक्टोबर महिन्यात सत्र न्यायालयाने दोषी ठरवून सहा महिन्यांची शिक्षा ठोठावताना शिक्षा तात्पुरती स्थगित केली होती. सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सेल्वन यांनी हायकोर्टात अपील दाखल करून जामीनासाठी अर्ज केला होता. अपीलावर लवकरात लवकर सुनावणी घेण्याची आणि अपील निकाली निघेपर्यंत शिक्षा स्थगित करण्याची मागणी सेल्वन यांनी केली होती.

या याचिकेवर न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी सेल्वन यांच्या वतीने सत्र न्यायालयाच्या शिक्षेलाच आक्षेप घेतला. या प्रकरणात सेल्वन यांनी मारहाण केल्याचे प्रथमदर्शनी एकही साक्षीदार नव्हता तसेच महापालिकेने संबंधित बांधकामांवर कारवाईच्या आधी रहिवाशांना नोटीस दिली गेली नव्हती. त्यामुळे, रहिवाशांना न्यायालयात दाद मागण्यासाठी वेळ देण्याची विनंती करण्यासाठी सेल्वन हे घटनास्थळी गेले होते, असा दावा केला. तर सरकारी वकिलांनी सेल्वन यांच्या मागणीला विरोध केला. न्यायालयाने याचिकेची दखल घेत शिक्षेविरोधात केलेले अपील निकाली निघेपर्यंत सहा महिन्यांच्या शिक्षेला स्थगिती देत त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला. तसेच अपीलावर लवकरात लवकर सुनावणी घेण्याचे स्पष्ट करून प्रकरण आणि त्याच्याशी संबंधित कागदपत्रे उच्च न्यायालय रजिस्टार कार्यालयाकडे वर्ग करण्याचे आदेश दिले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in