पाच महिलांशी लग्न करणाऱ्या रायगडच्या 'लखोबा'ला हायकोर्टाचा झटका

एक महिलेच्या तक्रारीमुळे अटकेची शक्यता निर्माण झाल्याने अटकपूर्व जामिनासाठी धाव घेणाऱ्या या नवरदेवाला मुंबई हायकोर्टाने चांगलाच दणका दिला.
Mumbai High Court

Mumbai High Court

मुंबई : एक-दोन नव्हेतर तब्बल पाच महिलांशी विवाह करून लग्नाच्या बेडीत अडकलेला नवरदेव अखेर कायद्याच्या बेडीत अडकण्याची चिन्हे आहेत. एक महिलेच्या तक्रारीमुळे अटकेची शक्यता निर्माण झाल्याने अटकपूर्व जामिनासाठी धाव घेणाऱ्या या नवरदेवाला मुंबई हायकोर्टाने चांगलाच दणका दिला. न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांनी वेगवेगळ्या महिलांच्या मुलांच्या जन्मदाखल्यावर पिता म्हणून त्याचे नाव आढळल्याने न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.

रायगड येथील शांतीलाल खरात याची एक महिलेशी मॅट्रोमोनियल साईटच्या माध्यमातून ओळख झाली. त्यानंतर अवघ्या दोन महिन्यांत त्यांनी विवाह केला. लग्नानंतर खरातने ७ लाख रुपये घेतले तसेच वेगवेगळे दागिने गहाण ठेवून तब्बल ३२ लाख रुपयांचे कर्जही घेतले. आपण फसलो गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्या महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणात अटकेची शक्यता असल्याने शांतीलाल खरात यांनी उच्च न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली.

या याचिकेवर न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी तक्रारदार महिलेच्या वतीने याचिकेला जोरदार विरोध करण्यात आला. खरातने किमान पाच महिलांशी लग्न केले असून त्या महिलांच्या मुलांच्या जन्म प्रमाणपत्रावर पिता म्हणून त्याचे नाव आहे, असा दावा केला. तसेच २००८ ते २०१८ या कालावधीत घेतलेल्या घटस्फोटांच्या प्रक्रियेची माहिती न्यायालयाला दिली. याची गंभीर दखल न्यायालयाने घेतली. अर्जदाराने यापूर्वी अनेक महिलांशी लग्न केले आहे आणि ही धक्कादायक बाब लपवून ठेवल्याचे उपलब्ध पुराव्यांवरून स्पष्ट होत आहे, अशा परिस्थितीत त्याला अटकपूर्व जामीन मंजूर करता येणार नाही, असे स्पष्ट करत खरातची याचिका फेटाळून लावली.

logo
marathi.freepressjournal.in