देशमुख यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास हायकोर्ट असमर्थ

आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी अनिल देशमुखांना २ नोव्हेंबर, २०२१ रोजी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली
देशमुख यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास हायकोर्ट असमर्थ
Published on

मनी लाँड्रिंग प्रकरणात जामीन मिळावा म्हणून उच्च न्यायालयात धाव घेणाऱ्या राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पदरी शुक्रवारी निराशा पडली. न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी देशमुख यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास असमर्थता दर्शवत नकार दिला. त्यामुळे आता या याचिकेवर अन्य न्यायालयासमोर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.

आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी अनिल देशमुखांना २ नोव्हेंबर, २०२१ रोजी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली होती. तेव्हापासून देशमुख हे न्यायालयीन कोठडीत आहेत. या वर्षी मार्चमध्ये विशेष न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर देशमुखांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आपल्या प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणास्तव देशमुखांनी जामीन मागितला होता. तसेच ईडीचा खटला खोटा आणि अर्थहीन असल्याचे दावा केला होता. या प्रकरणात ईडीने आपल्याला लक्ष्य केले असून, तपास यंत्रणा आपल्या अधिकाराचा गैरवापर करत असल्याचा आरोप करताना मनी लाँड्रिंगच्या आरोपांचेही खंडन करत सर्व कथित व्यवहार कागदोपत्री असल्याचा दावा केला होतो. आपण आता ७३ वर्षांचे असून, आपल्याला विविध आजारांनी ग्रासले असल्याने जामीन द्यावा, अशी विनंती केली होती.

logo
marathi.freepressjournal.in