वकिलांवरील निष्क्रियतेचे आरोप खपवून घेणार नाही! उच्च न्यायालयाची ताकीद

वकिलांवर निष्क्रियतेचे आणि निष्काळजीपणाचे आरोप न्यायालय खपवून घेणार नाही, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने पक्षकारांना ताकीद दिली आहे.
वकिलांवरील निष्क्रियतेचे आरोप खपवून घेणार नाही! उच्च न्यायालयाची ताकीद
Published on

मुंबई : वकिलांवर व्यावसायिक निष्काळजीपणाचा आरोप करण्याच्या पक्षकारांच्या प्रवृत्तीवर न्यायालयाने संताप व्यक्त केला. कार्यवाहीतील विलंबासाठी वकिलांना दोष देणे पूर्णपणे चुकीचे आहे. वकिलांवर निष्क्रियतेचे आणि निष्काळजीपणाचे आरोप न्यायालय खपवून घेणार नाही, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने पक्षकारांना ताकीद दिली आहे.

केवळ पक्षकाराने सांगितलेल्या घटनांच्या आधारावर न्यायालय वकिलांवरील व्यावसायिक निष्काळजीपणाचे आरोप स्वीकारू शकत नाही, असे निरिक्षण न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या एकलपीठाने नोंदवले. राहुल कबाडे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती जैन यांच्या समोर सुनावणी झाली. याचवेळी न्यायालयाने वकिलांवरील निष्काळजीपणाच्या आरोपांची गंभीर दखल घेतली आणि पक्षकारांना अशा स्वरूपाचे आरोप न करण्याचे बजावले. खटल्याला होणाऱ्या विलंबाचे कारण देण्यासाठी पक्षकारांनी पूर्वीच्या वकिलांवर आरोप करणे ही एक नियमित प्रथा बनली आहे. जर पक्षकार अशा चुकांसाठी आपल्या वकिलांना दोष देत असतील तर त्यांनी योग्य ती कायदेशीर कारवाईचे पाऊल उचलले पाहिजे. केवळ वकिलांविरुद्ध निष्काळजीपणाचा आरोप करणे गैर आहे. खटल्यात निर्माण झालेल्या गोंधळासाठी वकील जबाबदार असेल, तर त्या वकिलाला किमान पक्षकार बनवले पाहिजे, असेही न्यायालयाने सूचित केले.

logo
marathi.freepressjournal.in