
दक्षिण मुंबईतील पदपथवार संसार थाटणाऱ्या कुटुबांना हटकवण्याचे आदेश द्या, अशी विनंती करणाऱ्या बार असोसिएशनची विनंती मुंबई हायकोर्टाने फेटाळून लावली. बेघर होणे ही वैश्विक समस्या आहे. फुटपाथवर आश्रय घेणारी बेघर कुटुंबेही माणसेच आहे. त्यांचा फुटपाथवरील संसार हटवण्याचा आदेश आम्ही देऊ शकत नाही, अशी संवेदनशील भूमिका घेत न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने पदपथावरील कुटंबियांना हटविण्याचे आदेश पोलीस आणि पालिका प्रशासनाला देण्याची बॉम्बे बार असोसिएशनची विनंती फेटाळली.
मुंबई शहर आणि उपनगरांतील फूटपाथवर अनधिकृत विक्रेते तसेच फेरीवाल्यांनी कब्जा केल्याच्या मुद्द्यावर उच्च न्यायालयाने सुमोटो याचिका दाखल करून घेतली आहे. त्या याचिकेवर शुक्रवारी न्या. गौतम पटेल आणि न्या. डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. यावेळी बॉम्बे बार असोसिएशनने दक्षिण मुंबईच्या फाउंटन परिसराजवळील फूटपाथवर अनेक बेघर लोक राहत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देताना, त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी मुंबई पोलीस आणि मुंबई महापालिका प्रशासनाला अनेकदा पत्र लिहिली. मात्र त्या पत्रांना अनुसरून प्रशासनाकडून कुठलीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईचे निर्देश पोलीस आणि पालिका प्रशासनाला द्या, अशी विनंती बार असोसिएशनच्यावतीने अॅड. मिलिंद साठे यांनी केली.