पेडणेकर यांना हायकोर्टाचा दिलासा कायम

न्यायालयाने पेडणेकर यांना ईओडब्ल्यूच्या तपासात सहकार्य म्हणून ११, १३ आणि १६ सप्टेंबर या तीन दिवशी चौकशीला सामोरे जाण्याचे निर्देश दिले होते.
पेडणेकर यांना हायकोर्टाचा दिलासा कायम
Published on

मुंबई : कथित जम्बो कोविड सेंटर गैरव्यवहारप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या, माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना बुधवारी मुंबई हायकोर्टाने अटकेपासून दिलेला दिलासा कायम ठेवला. न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांनी पेडणेकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी २२ जानेवारीपर्यंत तहकूब ठेवली.

कोरोना महामारीत बॉडीबॅगची चढ्या दराने खरेदी केली. त्या माध्यमातून वैयक्तिक आर्थिक लाभ मिळवल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी किशोरी पेडणेकर यांच्यासह काही पालिका अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पेडणेकर यांच्या याचिकेवर बुधवारी न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांच्यापुढे सुनावणी झाली. यावेळी ईओडब्ल्यूने तपास अंतिम टप्प्यात असल्याने वेळ मागितला. याची दखल घेत न्यायालयाने सुनावणी २२ जानेवारीपर्यंत तहकूब ठेवली. न्यायालयाने पेडणेकर यांना ईओडब्ल्यूच्या तपासात सहकार्य म्हणून ११, १३ आणि १६ सप्टेंबर या तीन दिवशी चौकशीला सामोरे जाण्याचे निर्देश दिले होते.

logo
marathi.freepressjournal.in