राजन साळवी यांच्या कुटुंबीयांना हायकोर्टाचा दिलासा, पुढील सुनावणीपर्यंत अटक न करण्याचे निर्देश

शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांच्या मागे एसीबीने बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी चौकशीचा ससेमिरा सुरू केला.
राजन साळवी यांच्या कुटुंबीयांना हायकोर्टाचा दिलासा, पुढील सुनावणीपर्यंत अटक न करण्याचे निर्देश
Published on

मुंबई : बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी एसीबीने गुन्हा दाखल केल्याने वादाच्या भोवऱ्यात अडकलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या पत्नी अनुजा साळवी आणि मुलगा शुभम साळवी यांना मुंबई हायकोर्टाने दिलासा दिला. न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांनी साळवी कुटुंबीयांना २ ते ८ मार्च या कालावधीत तपास यंत्रणेसमोर चौकशीला हजर राहा, असे निर्देश देत पुढील सुनावणीपर्यंत अटकेसारखी कठोर कारवाई करू नका, असे निर्देशही तपास यंत्रणेला दिले.

शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांच्या मागे एसीबीने बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी चौकशीचा ससेमिरा सुरू केला. कुटंबाविरोधात दोन कोटी मालमत्तेप्रकरणी हा गुन्हा दाखल केला. या प्रकरणी अटकेची शक्यता असल्याने साळवी यांच्या पत्नी अनुजा आणि मुलगा शुभम यांच्या वतीने ॲॅड. राहुल आरोटे यांनी अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली. त्या अर्जावर न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲड. सुदीप पासबोला यांनी एसीबीच्या कार्यपद्धतीवर जोरदार आक्षेप घेतला.

तपासयंत्रणा राजकीय दबावतंत्रासाठी वापर करत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देत एसीबीची कारवाई रोखण्याची विनंती केली. त्याची गंभीर दखल न्यायालयाने घेतली. अनुजा साळवी आणि मुलगा शुभम साळवी यांना २ ते ८ मार्च या काळात तपास यंत्रणेच्या चौकशीला सामोरे जा, असे हायकोर्टाने स्पष्ट केले.

logo
marathi.freepressjournal.in