समीर वानखेडेंना हायकोर्टाचा दिलासा कायम

या याचिकेवर न्यायमूर्ती प्रकाश नाईक आणि न्यायमूर्ती एन. आर. बोरकर यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी सुनावणी झाली
समीर वानखेडेंना हायकोर्टाचा दिलासा कायम

मुंबई : समीर वानखेडे यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. कॉर्डिलिया क्रुझ प्रकरणी ईडीने दाखल केलेल्या प्रकरणात १ मार्चपर्यंत कारवाईपासून संरक्षण देत समीर वानखेडेंना मुंबई हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. तसेच, ईडीने हा तपास दिल्लीकडे वर्ग केला आहे. या गुन्ह्यात अटकपूर्व जामिनासाठी समीर वानखेडेंनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. यावेळी ईडीने नोंदविलेल्या ईसीआयआरलाच आक्षेप घेत वानखेडे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सॉलीसिटर जनरल बाजू मांडणार असल्याने न्यायमूर्ती प्रकाश नाईक आणि न्यायमूर्ती एन. आर. बोरकर यांच्या खंडपीठाने याचिकेची सुनावणी १ मार्चपर्यंत तहकूब ठेवली.

मुंबई झोनल युनिटमध्ये दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यात यावा, प्रकरणाचा निकाल लागत नाही, तोपर्यंत ईडीने कोणतीही कारवाई करू नयेे. इतकेच नव्हे, तर ईडीने नोंदवलेला ईसीआयआर दिल्लीत वर्ग करण्यात येऊ नये, अशी मागणी करत समीर वानखेडे यांच्या वतीने ॲड. करण जैन यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

या याचिकेवर न्यायमूर्ती प्रकाश नाईक आणि न्यायमूर्ती एन. आर. बोरकर यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी सुनावणी झाली. यावेळी ईडीच्या वतीने ज्येष्ठ वकील ॲड. संदेश पाटील यांनी या प्रकरणात सॉलीसिटर जनरल बाजू मांडणार असल्याचे स्पष्ट केले. याची दखल घेत खंडपीठाने याचिकेची सुनावणी १ मार्चपर्यंत तहकूब ठेवली.

logo
marathi.freepressjournal.in