प्रमुख लढत असलेल्या माहीममध्ये स‌र्वाधिक मतदान; मुंबई शहरात ५२.६९ टक्के मतदान

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या माहीम विधानसभा मतदारसंघात बुधवारी मुंबई शहरातील सर्वाधिक मतदान झाले. मुंबई शहर जिल्ह्यात विधानसभेच्या दहा मतदारसंघांसाठी बुधवारी सरासरी ५२.६९ टक्के मतदान झाले.
सदा सरवणकर, अमित ठाकरे, महेश सावंत (डावीकडून)
सदा सरवणकर, अमित ठाकरे, महेश सावंत (डावीकडून)
Published on

मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या माहीम विधानसभा मतदारसंघात बुधवारी मुंबई शहरातील सर्वाधिक मतदान झाले. मुंबई शहर जिल्ह्यात विधानसभेच्या दहा मतदारसंघांसाठी बुधवारी सरासरी ५२.६९ टक्के मतदान झाले.

सर्वाधिक ५९.०१ टक्के मतदान माहीममध्ये, तर सर्वात कमी ४४.४४ टक्के मतदान कुलाब्यात झाले. ेनिवडणूक आयोगाने गुरुवारी दिलेल्या अंतिम आकडेवारीवरून हे चित्र स्पष्ट झाले. विशेष म्हणजे या दहा मतदारसंघांत पुरुष मतदारांच्या तुलनेत महिलांचे सरासरी मतदानाचे प्रमाण काकणभर सरस म्हणजे १.४३ टक्क्यांनी जास्त आहे. मुंबई शहर जिल्ह्यात धारावी, सायन कोळीवाडा, वडाळा, माहीम, वरळी, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी आणि कुलाबा या दहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. या दहा मतदारसंघांमध्ये एकूण २५ लाख ४१ हजार ८१० मतदार आहेत. त्यापैकी १३ लाख ६५ हजार ९०४ पुरुष, तर ११ लाख ७७ हजार ४६२ महिला आहेत. यापैकी सात लाख १० हजार १७४ पुरुषांनी आणि सहा लाख २९ हजार ४९ महिलांनी मतदान केले.

तृतीयपंथीयांचे ३१.१५ टक्के मतदान

मुंबई शहरातील दहा मतदारसंघांमध्ये तृतीयपंथी मतदारांची संख्या २४४ आहे. त्यापैकी ७६ जणांनी म्हणजेच ३१.१५ टक्के जणांनी मतदान केले.

logo
marathi.freepressjournal.in