मुंबई : इमारतीत आगीची घटना टाळण्यासाठी फायर फायटिंग सिस्टिम कार्यान्वित आहे की नाही, याची तपासणी करण्याचा निर्णय अग्निशमन दलाने घेतला आहे. पुढील आठवड्यापासून हायराइज इमारतीत सरप्राइज व्हिजिट देण्यात येणार असून ज्या इमारतीत अग्निसुरक्षा यंत्रणा बंद असल्यास कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, असा इशारा मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख रवींद्र आंबुलगेकर यांनी दिला आहे.
मुंबईत आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून ८० टक्के आगीच्या घटना सदोष इलेक्ट्रिक वायरिंगमुळे घडल्याचे निदर्शनास आले आहे. मुंबईत लागणाऱ्या आगीच्या घटनांमध्ये हायराइज इमारतीत आग लागण्याचे प्रकार अधिक असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पुढील आठवड्यापासून हायराइज इमारती, लॉज आदी ठिकाणी फायर फायटिंग सिस्टिमच्या उपाययोजनांची अंमलबजावणी केली आहे की नाही, याची तपासणी करण्यात येणार असल्याचे आंबुलगेकर म्हणाले.
गेल्या काही वर्षांत मुंबईत आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून जिवितहानी व मालमत्तेचे नुकसान झाले आहे. मुंबईत आगीच्या घटना रोखण्यासाठी आपल्या वास्तूत आग प्रतिबंधक सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करणे संबंधितांची जबाबदारी आहे. दर सहा महिन्यांनी संबधित इमारतीतील रहिवाशांनी अथवा इमारतीतील पदाधिकाऱ्यांनी अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित केल्याचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. मात्र घटनास्थळी बचावकार्य सुरू असताना इमारतीतील फायर फायटिंग सिस्टिम बंद असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे विशेष करून हायराइज इमारती व लॉजमध्ये फायर फायटिंग सिस्टिम कार्यान्वित केली की नाही, याची तपासणी करण्यात येणार असल्याचे आंबुलगेकर यांनी सांगितले.
महिन्यांतून एकदा सरप्राइज व्हिजिट
हायराइज इमारती, व्यावसायिक इमारती अशा ठिकाणी फायर फायटिंग सिस्टिम उपाययोजनांची अंमलबजावणी होते की नाही, याची तपासणी करण्यात येणार आहे. महिन्यांतून एकदा तरी सरप्राइज व्हिजिट करणार असून आगीच्या घटना टाळण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
- रवींद्र आंबुलगेकर, मुख्य अग्निशमन अधिकारी, मुंबई अग्निशमन दल
१२० दिवसांची मुदत!
अग्निसुरक्षा यंत्रणा बंद असल्यास संबंधितांना नोटीस बजावत, १२० दिवसांची मुदत देण्यात येते. मात्र १२० दिवसांत अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित न केल्यास कायदेशीर कारवाई करत वीज व पाणी कनेक्शन कापण्यात येते.
फायर अॅक्टनुसार अशी होते कारवाई
८१-१ मध्ये नोटीस दिली जाते
८२-२ मध्ये वीज पाणी कनेक्शन कट
८३-३ मध्ये संबंधित आस्थापना सील करण्यात येते