मुस्लीम रिवाजानुसार वागत नसल्याने हिंदू पत्नीची हत्या

रूपाली उर्फ जाराने मुस्लीम रीतीरिवाजाप्रमाणे वागून धर्माप्रमाणे पेहराव (बुरखा) घालावा, तसेच हिंदीमध्ये बोलावे
मुस्लीम रिवाजानुसार वागत नसल्याने हिंदू पत्नीची हत्या

मुस्लीम रीतीरिवाजानुसार वागत नसल्याने मुस्लीम पतीने हिंदू पत्नीची भोसकून हत्या केल्याची घटना चेंबूरमध्ये उघडकीस आली आहे. रूपाली उर्फ जारा इक्बाल शेख असे या महिलेचे नाव असून, हत्येचा गुन्हा नोंद होताच इक्बाल मोहम्मद अहमद शेख (३६) या आरोपी पतीला टिळकनगर पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर त्याला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

रूपाली उर्फ जाराने मुस्लीम रीतीरिवाजाप्रमाणे वागून धर्माप्रमाणे पेहराव (बुरखा) घालावा, तसेच हिंदीमध्ये बोलावे, यावरून त्यांच्यात सतत खटके उडत होते. याच कारणावरून त्यांच्यातील वाद विकोपास गेले होते. त्यात तिने घटस्फोट घेण्यासह मुलाचा ताबा देण्यास नकार दिला होता. त्यातून इक्बालने तिची हत्या केल्याचे बोलले जाते.

रूपाली रमेश चंदनशिवे उर्फ जारा हिचा तीन वर्षांपूर्वी इक्बालसोबत प्रेमविवाह झाला होता. या दोघांना दोन वर्षांचा एक मुलगा आहे. इक्बालचे हे दुसरे लग्न असून त्याने पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला होता. त्यानंतर त्याने रूपालीसोबत प्रेमविवाह केला होता. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यात कौटुंबिक वाद सुरू होता. या वादाला कंटाळून ती सहा महिन्यांपासून इक्बालपासून वेगळी राहत होती. सोमवारी रात्री १०.१५ वाजता इक्बाल तिला भेटण्यासाठी चेंबूर येथील राहुलनगर, प्रगती चाळीतील गल्लीत आला होता. यावेळी त्यांच्यात घटस्फोटासह मुलाचा ताबा देण्यावरून प्रचंड वाद झाला. या वादानंतर इक्बालने तिच्या गळ्यावर आणि हातावर तीक्ष्ण हत्याराने वार केले, त्यात ती गंभीररीत्या जखमी झाली होती. जखमी अवस्थेत तिला तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी तिची बहीण करुणा रॉय हिच्या तक्रारीवरून टिळकनगर पोलिसांनी इक्बालविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. त्यामुळे पोलिसांनी याबाबत तपास करून पतीला फाशी द्यावी, अशी मागणी तिच्या नातेवाईकांनी केली आहे.

लव्ह जिहादचा प्रकार नाही

याप्रकरणी केलेल्या तपासात ‘लव्ह जिहाद’चा कोणताही प्रकार घडलेला दिसत नाही. आरोपी आणि त्याच्या पत्नीमध्ये मुस्लीम धर्माच्या रीतीरिवाजावरून कोणताही वाद नव्हता. त्यामुळे या प्रकरणाला ‘लव्ह जिहाद’चा रंग देऊ नये, तसेच अफवा पसरवून सामाजिक तणाव निर्माण करू नये, असे आवाहन टिळक नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी सुनील काळे यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in