आमदार सरोज अहिरेंच्या तक्रारीनंतर हिरकणी कक्षात सुधारणा; शिंदे-फडणवीस सरकारने घेतली दखल

राज्य मंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार सरोज अहिरेंनी केलेल्या हिरकणी कक्षातील दुरावस्थेचा मुद्दा चांगलाच गाजला
आमदार सरोज अहिरेंच्या तक्रारीनंतर हिरकणी कक्षात सुधारणा; शिंदे-फडणवीस सरकारने घेतली दखल

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुंबई विधानसभेतील हिरकणी कक्षाच्या दुरावस्थेचा मुद्दा चांगलाच गाजला होता. मुंबई विधानसभेमध्ये अधिवेशनासाठी आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहिरे यांनी हिरकणी कक्षाची अवस्था चांगली नसल्याची तक्रार करत अधिवेशन अर्धवट सोडले. त्यानंतर आता शिंदे-फडणवीस सरकारने त्यांच्या तक्रारीची दखल घेत हिरकणी कक्षात सुधारणा केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हिरकणी कक्षाची साफसफाई करण्यात आली असून तिथे पलंगाचीदेखील सोय करण्यात आली आहे. याशिवाय नवा सोफा आणि पाळणादेखील बसवण्यात आला आहे. त्यानंतर आमदार सरोज अहिरेंनी राज्य सरकारने केलेल्या या कारवाईचे स्वागत केले. त्या म्हणाल्या की, "माझ्या तक्रारीची दखल राज्य सरकारने घेतली असून मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानते. माझ्यासारख्याच इतर महिलांसाठी हिरकणी कक्ष उभे करावे, अशी अपेक्षा आहे. येत्या ८ मार्चला महिला दिनादिवशी जर मुख्यमंत्र्यांनी सर्वच महिला वर्गासाठी हिरकणी कक्षा उभारण्याची घोषणा केली तर ते उत्तम ठरेल." अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in