शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्‍तारातून 'यांचा' पत्ता कट

विस्‍तारानंतर भाजपमध्येही पक्षांतर्गत बदल अपेक्षित असून नवीन प्रदेशाध्यक्ष तसेच मुंबई अध्यक्षपदावर नियुक्‍ती अपेक्षित आहे.
शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्‍तारातून 'यांचा' पत्ता कट

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्‍तारात शिंदे गटाचे औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट आणि रायगड जिल्ह्यातील महाडचे आमदार भरत गोगावले यांचा समावेश झालेला नाही. भाजपच्या प्रवीण दरेकर आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचाही पहिल्‍या फेरीत समावेश झालेला नाही. बच्चू कडू यांचेही नाव चर्चेत होते; मात्र त्‍यांनादेखील संधी मिळालेली नाही. दरम्‍यान, विस्‍तारानंतर भाजपमध्येही पक्षांतर्गत बदल अपेक्षित असून नवीन प्रदेशाध्यक्ष तसेच मुंबई अध्यक्षपदावर नियुक्‍ती अपेक्षित आहे.

मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाकडून औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट आणि रायगड जिल्ह्यातील महाडचे आमदार भरत गोगावले यांचा समावेश जवळपास नक्की मानला जात होता. शिरसाट हे सुरुवातीपासून शिंदे यांच्या जवळचे आहेत; मात्र अब्दुल सत्तार यांच्या समावेशामुळे शिरसाट यांचे नाव मागे पडले, तर शिंदे गटाचे मुख्य प्रतोद असलेल्या गोगावले यांना मंत्रिपदाचा शब्द देण्यात आला होता; मात्र शब्द पाळला न गेल्याने गोगावले नाराज असल्याचे समजते. उद्धव ठाकरे सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या सर्वांचा समावेश शिंदे यांनी मंत्रिमंडळात केला आहे. तर भाजपने मंत्रिपदाचे दावेदार असलेल्या प्रवीण दरेकर आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना पहिल्या विस्तारात स्थान दिलेले नाही. दरेकर हे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते होते. त्यामुळे त्यांना मंत्रिपदाची खात्री होती; मात्र भाजप मंत्र्यांच्या यादीत त्यांचा समावेश होऊ शकला नाही.

भाजपच्या यादीवर फडणवीस यांची छाप

भाजपच्या नऊ मंत्र्यांच्या यादीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची छाप दिसते. केवळ फडणवीस यांच्या आग्रहामुळेच राधाकृष्ण विखे-पाटील, डॉ. विजयकुमार गावित, गिरीश महाजन, सुरेश खाडे, रवींद्र चव्हाण, अतुल सावे यांना मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे.

भाजपमध्येही बदल?

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तसेच मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांची मंत्रिपदी नियुक्‍ती झाल्‍याने येणाऱ्या काळात भाजपमध्ये पक्षांतर्गत बदल अपेक्षित आहेत. चंद्रशेखर बावनकुळे तसेच आशिष शेलार यांची नावे प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत. आशिष शेलार यांच्याकडे कदाचित मुंबई महापालिका निवडणूक लक्षात घेता मुंबई अध्यक्षपदाचीही जबाबदारी देण्यात येऊ शकते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in