मुंबईत तूर्त एचएमपीव्हीचा रुग्ण नाही; मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागाचा दावा

मुंबई शहर व उपनगरात असा ‘मेटान्यूमोव्हायरस विषाणू (HMPV) बाधित रुग्ण आढळून आलेला नाही, अशी माहिती मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.
मुंबईत तूर्त एचएमपीव्हीचा रुग्ण नाही; मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागाचा दावा
Published on

मुंबई :  मुंबई शहर व उपनगरात असा ‘मेटान्यूमोव्हायरस विषाणू (HMPV) बाधित रुग्ण आढळून आलेला नाही, अशी माहिती मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे. नागरिकांनी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे, असे आवाहनही महानगरपालिका प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

चीनमध्ये सुरू असलेल्या मानवी ‘मेटान्यूमोव्हायरस’ (HMPV) विषाणूच्या साथ उद्रेक समोर येत आहे. त्यासाठी आरोग्य सेवा संचालनालयाने सोमवारी मार्गदर्शक सूचना जारी केली. कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नयेत, याबाबतची माहिती मार्गदर्शक सूचनांच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत.

चीनमध्ये आढळून आलेला विषाणू  मानवी ‘मेटान्यूमोव्हायरस’ (HMPV) अहवालाबाबत चिंतेचे कारण नाही. याबाबत आवश्यक दक्षता घेण्यात येत असून नाहक भीतीचे वातावरण निर्माण करण्याची गरज नाही. सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील श्वसनाच्या संसर्गाच्या आकडेवारीचे विश्लेषण केले आहे. वर्ष २०२३ च्या तुलनेत डिसेंबर २०२४ मध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. तथापि, खबरदरीचा एक भाग म्हणून नागरिकांनी श्वसनांच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि काय करू नये, यासंदर्भातील सूचनाचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

एचएमपीव्हीबाबत विशेष काळजी घ्यावी - डॉ. दीपक सावंत

एचएमपी व्हायरसबाबत महाराष्ट्रात सावधगिरी आवश्यक असल्याचे मत माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी व्यक्त केले आहे. मुंबईत येणाऱ्या प्रवाशांसासाठी चाचणी सुविधा उपलब्ध करावी थर्मल स्क्रीनिंग व विमान प्रवासात मास्क वापरण्याच्या सूचना प्रसारित कराव्यात, असेही त्यांनी म्हटले आहे.

डाॅ. सावंत यांनी म्हटले आहे की, मुंबईत हजारो प्रवासी विमान मार्गे उतरतात. त्यासाठी विशेष करून हवाई मार्गाने किंवा जलवाहतूक मार्गाने आलेल्या प्रवाशांची तपासणी करणे योग्य ठरेल. या प्रवाशांमध्ये काही लक्षणे आहेत का याची तपासणी व्हायला हवी. एचएमपी व्हायरसची लागण होण्याचा कालावधी ८ ते १० दिवसाचा असतो. चिकुनगुनिया महाराष्ट्रात आहेच; तसेच एचएमपी व्हासरस संक्रमित झाला तर महाराष्ट्रात आरोग्य व्यवस्थेवर ताण पडेल. जागतिक आरोग्य संघटनेची मार्गदर्शक तत्त्वे वेळोवेळी नागरिकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, अशा सूचना देण्यात याव्यात. कोविडप्रमाणे या व्हायरसवरदेखील आषधोपचार नसल्याने आरोग्य यंत्रणेने सज्ज राहण्याचे आवाहनही माजी आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.

व्हायरस टाळण्यासाठी एवढे करा

खोकला किंवा शिंका येत असतील तर तोंड आणि नाक रूमाल किंवा टिश्यू पेपरने झाकावे.

साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने वारंवार हात धुवावेत.

ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहावे.

भरपूर पाणी प्यावे आणि पौष्टिक खावे.

संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे वायुविजन (व्हेंटिलेशन) होईल, याची दक्षता घ्यावी.

या बाबी टाळण्याचे आव्हान 

हस्तांदोलन

टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर

आजारी लोकांशी जवळचा संपर्क

डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे

सार्वजनिक ठिकाणी थुंकणे 

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय

औषध (सेल्फ मेडिकेशन) घेणे

काय आहे मेटान्यूमोव्हायरस?

मानवी मेटान्यूमोव्हायरस (HMPV) तीव्र श्वसन संसर्गाचे एक प्रमुख कारण आहे. मानवी मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) हा एक सामान्य श्वसन विषाणू आहे. यामुळे व श्वसनमार्गाच्या वरील भागातील संसर्गास (सर्दीसारख्या) कारणीभूत ठरते. हा रोग सामान्यतः आरएसव्ही आणि फ्लूप्रमाणे हिवाळा आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला उद्भवतो. हा विषाणू सर्वप्रथम नेदरलँडमध्ये वर्ष २००१ मध्ये आढळला होता.

logo
marathi.freepressjournal.in