गिरीश चित्रे
मुंबई : दिवाळीच्या सणात घराच्या प्रवेशद्वारापासून भिंतींपर्यंत आकर्षक सजावट करण्याची जोरदार तयारी सुरु आहे. मात्र, यंदा पारंपरिक सजावटीच्या साहित्याबरोबरच प्लास्टिकच्या रंगीबेरंगी सजावटीच्या स्टिकरना महिलांकडून विशेष पसंती मिळत आहे. फुले, पाने, दिवे, पणत्या, लक्ष्मीची पावले, स्वस्तिक, तोरण आणि विविध शुभचिन्हांच्या आकारातील स्टिकर बाजारात उपलब्ध झाले आहेत. कमी वेळेत घराला आकर्षक रूप देता येत असल्याने अशा सजावटीची क्रेझ वाढत आहे.
पूर्वी दिवाळीत घराच्या भिंती, दरवाजे आणि खिडक्यांची सजावट करण्यासाठी वीणकाम केलेली तोरणे, कागदी फुलांच्या माळा, आकाशकंदील आणि पारंपरिक सजावटीच्या साहित्याचा वापर केला जात असे. आता मात्र तयार प्लास्टिकचे स्टिकर, विनाइल डेकोरेशन आणि चिकटवता येणाऱ्या सजावटीच्या पट्ट्यांना अधिक मागणी आहे.
कमी जागेतही आकर्षक सजावट
विशेषतः फ्लॅटमध्ये राहणाऱ्या कुटुंबांसाठी हा पर्याय सोयीचा ठरत आहे. कमी जागेतही आकर्षक सजावट करता येते. शिवाय सजावटीसाठी फारसा वेळ खर्च करावा लागत नाही. दरम्यान, प्लास्टिक स्टिकर मुळे घरात घाण होत नाही, तसेच सजावटही आकर्षक दिसते. त्यामुळे बाजारात प्लास्टिकच्या विविध स्टिकरची खरेदी केल्याचे दादर येथे राहणाऱ्या गृहीणी संगीता पाटील यांनी सांगितले.
दर २० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंत
बाजारात लहान सजावटीचे स्टिकर २० ते ५० रुपयांपर्यंत, तर आकर्षक शुभचिन्हांचे आणि फुलांच्या नक्षीचे स्टिकर ५० ते १५० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. मोठ्या आकारातील दरवाजा व भिंतींचे डेकोरेटिव्ह स्टिकर २०० ते ५०० रुपयांपर्यंत मिळत आहेत. प्लास्टिकची तोरणे ५० ते २५० रुपये, तर सजावटीच्या माळा आणि पट्ट्यांचे दर ३० ते २०० रुपयांपर्यंत आहेत. विविध आकारांतील रेडिमेड सजावटीचे संचही बाजारात उपलब्ध आहेत.
कमी वेळेत होणाऱ्या सजावटीवर भर
विशेष म्हणजे हे स्टिकर सहज चिकटवता आणि काढता येत असल्याने घराच्या सजावटीसाठी त्यांचा वापर वाढत आहे. आकर्षक रंग, वेगवेगळ्या नक्षी आणि तुलनेने कमी वेळेत होणारी सजावट यामुळे यंदाच्या दिवाळीत प्लास्टिक स्टिकरचा ट्रेंड पाहायला मिळत आहे.