मान्यवर मराठीजनांचा आज यथोचित गौरव! मराठी भाषा दिनानिमित्त पुरस्कार सोहळा; साहित्याच्या विकासासाठी काम करणाऱ्यांचा सन्मान
मुंबई : मराठी भाषेच्या गौरवार्थ आणि भाषा व साहित्याच्या विकासासाठी कार्यरत असणाऱ्या मान्यवरांच्या सन्मानार्थ उद्या गुरुवारी मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे सायंकाळी ५ वाजता पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
मराठी भाषा गौरव दिन तसेच ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीप्रित्यर्थ आयोजित या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, कौशलमंत्री मंगलप्रभात लोढा, मराठी भाषा मंत्री उदय सामंत, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, विरोधी नेते अंबादास दानवे, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आदी उपस्थित राहणार आहेत.
ग्रामीण साहित्यासाठी २०२३ चे पुरस्कार जाहीर झाले आहे. वाङमय पुरस्कार प्रकारात प्रौढ वाङमय अंतर्गत काव्य प्रकारामध्ये कवी केशवसूत पुरस्कार हा एकनाथ पाटील यांना ‘अनिष्ठकाळाचे भयसूचन’ या पुस्तकासाठी जाहीर झाला आहे. नाटक / एकांकिका करिता राम गणेश गडकरी पुरस्कार हा मकरंद साठे यांना, कादंबरीकरिता हरी नारायण आपटे पुरस्कार हा आनंद विंगकर यांना, लघुकथेकरिता दिवाकर कृष्ण पुरस्कार हा दिलीप नाईक-निबांळकर यांना, ललित गद्यकरिता अनंत काणेकर पुरस्कार अंजली जोशी यांना, विनोदाकरिता श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार हा शेखर गायकवाड यांना चरित्राकरिता न. चिं. केळकर पुरस्कार हा विवेक गोविलकर, आत्मचरित्रासाठी लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार हा डॉ. वसंत भा. राठोड यांना समीक्षा, संशोधन, सौंदर्यशास्त्र, ललितकला व आस्वादपर लेखनाकरिता श्री. के. क्षीरसागर पुरस्कार हा समीर चव्हाण यांना जाहीर झाला आहे. तसेच प्रौढ वाङमय राज्यशास्त्र अथवा समाजशास्त्रासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कारांसाठी शिफारस नाही.
प्रौढ वाङमय इतिहासाकरिता शाहू महाराज पुरस्कार प्रकाश पवार यांना, भाषाशास्त्र अथवा व्याकरणाकरिता नरहर कुरूंदकर पुरस्कार उज्ज्वला जोगळेकर यांना, विज्ञान व तंत्रज्ञानाकरिता महात्मा जोतीराव फुले पुरस्कार हा सुबोध जावडेकर यांना, शेती व शेतीविषयक पूरक व्यवसाय लेखनाकरिता वसंतराव नाईक पुरस्कार हा डॉ. ललिता विजय बोरा यांना, तसेच उपेक्षितांच्या साहित्यकरिता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार हा सुनीता सावरकर यांना जाहीर झाला आहे. तत्वज्ञान व मानसशास्त्रासाठी ना. गो. नांदापूरकर पुरस्कार हा या. रा. जाधव यांना, शिक्षणशास्त्रासाठी कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार हा हेमंत चोपडे यांना, पर्यावरणासाठी डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्कार हा माधव गाडगीळ यांना, संपादित अथवा आधारितसाठी रा. ना. चव्हाण पुरस्कार संपादक रविमुकुल यांना, अनुवादितकरिता तर्कतीर्थ लक्ष्मणशात्री जोशी पुरस्कार हा अनुवादक श्रीकांत अरूण पाठक यांना, तर संकीर्णकरिता भाई माधवराव बागल पुरस्कार हा सुप्रिया राज यांना जाहीर झाला आहे.
वाङमय पुरस्कार प्रकारात बाल वाङमयमध्ये कवितेकरिता बालकवी पुरस्कार हा प्रशांत असनारे यांना, नाटक व एकांकिकाकरिता भा. रा. भागवत पुरस्कार संजय शिंदे यांना, कादंबरी प्रकारात साने गुरूजी पुरस्कार हा रेखा बैजल यांना, कथा प्रकारात राजा मंगळवेढेकर पुरस्कार हा शरद आपटे यांना सर्वसामान्य ज्ञानकरिता यदुनाथ थत्ते पुरस्कार हा डॉ. प्रमोद बेजकर यांना, तर बालवाङमय संकीर्ण या प्रकारातील ना. धो. ताम्हणकर पुरस्कार हा डॉ. आनंद नाडकर्णी यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे स्वरूप ५० हजार रूपये आहे. वाङमय पुरस्कार प्रकारात प्रथम प्रकाशन अंतर्गत काव्याकरिता बहिणाबाई चौधरी पुरस्कार हा तान्हाजी रामदास बोऱ्हाडे यांना, नाटक/एकांकिकाकरिता विजय तेंडुलकर पुरस्कार हा हरीष बोढारे यांना, कादंबरी या प्रकारातील श्री. ना. पेंडसे पुरस्कार हा प्रदीप कोकरे यांना, लघुकथेसाठीचा ग. ल. ठोकळ पुरस्कार हा डॉ. संजीव कुलकर्णी यांना, ललितगद्याचा ताराबाई शिंदे पुरस्कार हा गणेश मनोहर कुलकर्णी यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे स्वरूप ५० हजार रुपये असे आहे. तर प्रथम प्रकाशन समीक्षा सौंदर्यशास्त्र या प्रकारातील रा. भा. पाटणकर पुरस्कारासाठी शिफारस नाही.
मराठी भाषा विभाग अंतर्गत २०२४ साठी विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब रंगराव बोराडे यांना जाहीर झाला आहे.
नामवंत प्रकाशन संस्थेसाठी २०२४ चा पु. भागवत पुरस्कार हा ज्योत्स्ना प्रकाशन, पुणे या संस्थेला जाहिर झाला आहे.
डॉ. अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार २०२४ हा डॉ. रमेश सिताराम सुर्यवंशी यांना आणि मंगेश पाडगावकर भाषा संवर्धन पुरस्कार हा भीमाबाई जोंधळे यांना जाहीर झाला आहे.
आज मराठी भाषा गौरव दिन
मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले गेले आहेत. मातृभाषेचा गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय २१ जानेवारी २०१३ रोजी घेण्यात आला. कुसुमाग्रजांची मराठी साहित्य क्षेत्रात नाटककार, कथाकार, कांदबरीकार, कवी आणि समीक्षक म्हणून ख्याती आहे. मराठीचा सन्मान वाढविण्यात ज्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले, ज्यात 'विवेकसिंधू' (शा.श.१११०) हे मराठी भाषेतील पहिले ग्रंथ लिहिणारे आद्यकवी मुकुंदराज यांचे आणि मराठी भाषेला सर्वप्रथम सन १९६५ मध्ये राजभाषेचा दर्जा देऊन तिच्या समृद्धीसाठी विशेष उपाययोजना करणारे महानायक वसंतराव नाईक यांच्याही ऐतिहासिक योगदानाचे या निमित्ताने स्मरण केले जाते.
गल्लत मराठी राजभाषा दिनाची
अनेक वेळा 'मराठी भाषा गौरव दिन' आणि 'मराठी भाषा दिवस' याची गफलत केली जाते. 'मराठी भाषा गौरव दिवस' (२७ फेब्रुवारी) आणि 'मराठी राजभाषा दिवस' (१ मे) हे स्वतंत्र दिवस असून या दिवसाचे स्वतंत्र असे महत्त्व आहे. १ मे १९६०ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. महाराष्ट्र हे विशेषतः मराठी भाषिकांचे राज्य असल्याने "१ मे" दिवस हा मराठी राजभाषा दिन किंवा मराठी भाषा दिन म्हणून सन १९६५ पासून साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय वसंतराव नाईक सरकारने केला. महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा ही मराठी असेल असे जाहीर करणारे वसंतराव नाईक सरकार यांनी 'मराठी राजभाषा अधिनियम १९६४' सर्वप्रथम ११ जानेवारी १९६५ रोजी प्रसिद्ध केला. १९६६ पासून तो अंमलात आला.
लोकाधिकार समितीतर्फे आज कार्यक्रम
शिवसेनाप्रणीत स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या वतीने मराठी भाषा दिवस गुरुवार, २७ फेब्रुवारी रोजी बिर्ला मातोश्री सभागृह, मुंबई रुग्णालय शेजारी, न्यू मरीन लाईन्स येथे सायंकाळी ६ ते रात्री ९ या कालावधीत साजरा होणार आहे. कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख व माजी पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचारमंत्री आदित्य ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
कार्यक्रमाचे आयोजन स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष व खासदार अनिल देसाई, माजी आमदार विलास पोतनीस, महासंघ कार्याध्यक्ष आमदार सुनिल शिंदे, महासंघ सरचिटणीस प्रदिप मयेकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले असून कार्यक्रमाच्या नियोजनासाठी महासंघ पदाधिकारी, संलग्न समित्यांचे पदाधिकारी आणि विभागप्रमुख संतोष शिंदे तयारी करत आहेत. समित्यांचे पदाधिकारी कार्यक्रम स्थळाच्या परिसरात भगवे झेंडे, पताका आणि मराठी भाषा दिवसाचे फलक लाऊन परिसर सज्ज ठेवणार आहेत. कार्यक्रमादरम्यान, स्वर मैफिलचे परेश दाभोलकर प्रस्तुत बोल मराठी, ताल मराठी हा मराठी गाण्यांचा बहारदार कार्यक्रम होणार आहे. मराठी भाषा दिवस कार्यक्रमास शिवसेना नेते, उपनेते, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, विविध आस्थापनातील स्थानीय लोकाधिकार समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत, असे स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे सरचिटणीस प्रदिप मयेकर यांनी म्हटले आहे.