
मुंबई : थर्टी फर्स्ट, नवीन वर्षाचे स्वागत मुंबईकरांसह पर्यटक जल्लोषात करतात. थर्टी फर्स्ट अन् नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक मुंबईकर हॉटेल, रेस्टॉरंट किंवा क्लबमध्ये चमचमीत पदार्थांवर ताव मारतात. या दिवशी अन्न व औषध प्रशासन विभागाने विशेष तपासणी मोहीम राबवली आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, क्लबमध्ये येणाऱ्या ग्राहकांना निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ दिल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासन विभागाने दिला आहे.
२५ डिसेंबरपासून ख्रिसमस सुरू होत असून ३१ डिसेंबर रोजी २०२४ या वर्षाला निरोप देण्यासाठी थर्टी फर्स्ट आणि २०२५ या नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईकर, पर्यटक रात्रभर जल्लोष करतात. ३१ डिसेंबर हा दिवस १ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा केला जातो. या दिवशी नागरिक मोठ्या प्रमाणात हॉटेल, रेस्टॉरंट, क्लब या ठिकाणी जाऊन अन्न पदार्थांचा आस्वाद घेत असतात. या दिवशी अन्न पदार्थांच्या मागणीत वाढ होत असून ग्राहकांना निकृष्ट दर्जाचे अन्न पदार्थ दिले जाऊ नये यासाठी एफडीएच्या टीम मुंबईभर तपासणी करणार आहेत. ३१ डिसेंबरपर्यंत ही विशेष मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सह आयुक्त मंगेश माने यांनी दिली.
... तर नागरिकांनी तक्रार करावी!
कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी जनतेचा सक्रिय सहभाग गरजेचा आहे. अन्न पदार्थाची गुणवत्ता व दर्जाबाबत कोणतीही तक्रार असल्यास त्याबाबत सविस्तर माहिती प्रशासनाच्या १८००२२२३६५ या टोल फ्री नंबरवर करावी, असे आवाहन मुंबईकर व पर्यटकांना माने यांनी केले आहे.