पाळीव प्राण्यांचे घरोघरी सर्वेक्षण

मुंबईतील पाळीव प्राण्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सर्वेक्षणाच्या माध्यमातून नोंदणी अन् लसीकरण करण्यात येणार
पाळीव प्राण्यांचे घरोघरी सर्वेक्षण

मुंबई : मुंबईतील पाळीव प्राण्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सर्वेक्षणाच्या माध्यमातून नोंदणी अन् लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी ‘यूथ ऑर्गनायझेशन इन डिफेन्स ऑफ ॲॅनिमल्स’ आणि ‘झीमॅक्स टेक सोल्युशन प्रा. लिमिटेड’ या सेवाभावी संस्थांची मदत घेतली जाणार आहे. या मोहिमेद्वारे मुंबईतील विविध सदनिका, बंगले, सोसायट्यांमधील नागरिकांकडे असलेल्या पाळीव प्राण्यांची माहिती संकलित करण्यासाठी पालिकेचा कर्मचारी गट प्रत्येक सोसायटीला भेट देणार आहेत. मुंबईकरांनी या मोहिमेत सहभाग घेऊन कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.

प्राणी कल्याण करणे व त्यासोबतच प्राण्यांपासून मानवामध्ये होणारे संक्रमण टाळण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. इक्बाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविले जात आहेत. भटक्या कुत्र्यांच्या चाव्यामुळे माणसांना होणाऱ्या संक्रमणाचा धोका कमी करणे तसेच श्वानांना आवश्यक आरोग्य सुविधा पुरवण्याच्या उद्देशाने पालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाच्या वतीने ‘मुंबई रेबीज निर्मूलन प्रकल्पा’अंतर्गत भटक्या श्वानांच्या रेबीज प्रतिबंधक लसीकरणासाठी नुकतेच निरंतर अभियान हाती घेतले आहे. त्यानंतर आता पाळीव प्राण्यांची नोंदणी करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे

मुंबई शहरातील पाळीव प्राण्यांच्या लोकसंख्येबद्दल महत्त्वाची माहिती गोळा करण्यासाठी एक व्यापक सर्वेक्षण करत आहोत. प्राण्यांचे आरोग्य, लसीकरण स्थिती आणि नोंदणी याविषयी तपशील समाविष्ट असेल. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी पालिकेचे प्रतिनिधी मुंबईतील प्रत्येक सोसायटीला भेट देणार आहेत.

लिंकवर पाळीव प्राण्यांची नोंद करा!

पाळीव प्राण्यांच्या निरोगी आयुष्यासाठी तसेच रेबीज आणि लेप्टोस्पायरोसिस यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मुंबईकरांनी महानगरपालिकेला सहकार्य करावे. त्यासाठी https://www.pets-survey.org/bm या लिंकवर आपल्याकडे असलेल्या पाळीव प्राण्यांची नोंद करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in