मुंबई : दि मुंबई डिस्ट्रिक्ट को. ऑप. हौसिंग फेडरेशनच्या शिक्षण प्रशिक्षण केंद्र-कार्यालयाच्या नवीन इमारत वास्तू बांधकामाचा भूमिपूजन सोहळा आज ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक यांच्या शुभहस्ते आणि भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. विक्रोळीतील हौसिंग फेडरेशनचे हे उपकेंद्र गृहनिर्माण संस्थांसाठी अतिशय महत्वाचे आहे, असे प्रतिपादन यावेळी आमदार दरेकर यांनी केले.
या प्रसंगी मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, माजी आमदार मंगेश सांगळे, हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर, हौसिंग फेडरेशनचे संचालक वसंतराव शिंदे, सचिव डी. एस. वडेर, मुंबई बँकेचे संचालक नंदकुमार काटकर, पुरुषोत्तम दळवी, नितीन बनकर, जिजाबा पवार, विठ्ठलराव भोसले, आनंदराव गोळे, प्रकाश गंगाधरे, सीताराम राणे, चंद्रकांत वंजारी, भास्करराव राऊत यांच्यासह सर्व संचालक व अधिकारी वर्ग उपस्थित होता.
यावेळी बोलताना दरेकर म्हणाले की, आम्ही मुंबईत गृहनिर्माण संस्थांची २१ जागांसाठी असलेली निवडणूक लढवली. मुंबईतील सर्व गृहनिर्माण संस्थांनी आमच्यावर विश्वास टाकला आणि २१ च्या २१ जागा आमच्या पॅनलच्या मुंबईकरांनी निवडून दिल्या. देवेंद्र फडणवीस यांचा आशीर्वादही आमच्या मागे होता. त्यावेळी मुंबईकरांना शब्द दिला होता की, ईस्टन सबबला आणि वेस्टन सबबला एक-एक उपकेंद्र प्रशिक्षण करू जेणेकरून ज्येष्ठ नागरिकांना प्रवासाचा त्रास होणार नाही आणि वेळही जाणार नाही. आज त्या शब्दाची पूर्तता करतोय. साधारणतः दोन-तीन महिन्यात खाली दोन-अडीच हजार स्क्वे. फूट आणि वरही तेवढ्याच स्क्वे फुटाचे प्रशिक्षण केंद्र असणार आहे. हे प्रशिक्षण केंद्र म्हणजे चार भिंती नसून हौसिंग सोसायट्या, सहकारातील एक मार्गदर्शन करणारे केंद्र असणार आहे. येणाऱ्या काळात हे उपकेंद्र ईशान्य मुंबईची सेवा करणारे गृहनिर्माण संस्थांचे सहकारातील एक केंद्र ठरणार आहे.
दरेकर पुढे म्हणाले की, आज या उपकेंद्राच्या निमित्ताने एक केंद्र गृहनिर्माण संस्थांच्या विकासाचे केंद्र ईशान्य मुंबईला लाभले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जाहीर आभार मानतो की, खऱ्या अर्थाने मुंबईत या सहकार चळवळीला, मुंबई बँकेला ताकद दिली असेल तर ती देवेंद्र फडणवीस यांनी. आता गोरेगाव येथेही जागा मिळतेय. तेथीलही उपकेंद्र आपण सुरू करतोय. मुंबईतला सहकार वाचला पाहिजे, सशक्त झाला पाहिजे. आपली जिल्हा बँक ही २५ हजार कोटीच्यवर नेली पाहिजे, असे आवाहन करत येणाऱ्या काळात तशा प्रकारची पावले टाकणार असल्याचेही दरेकर म्हणाले.
मुंबईत सहकार भवन उभारणार
मुंबईत आपण एक सहकार भवन उभारणार आहोत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोरेगाव येथे झालेल्या सहकार परिषदेत तसा शब्द दिला आहे. एक-दोन महिन्यात सहकार भवनसाठी जागा मिळेल. ७-८ मजल्याचे उत्तुंग असे सहकार भवन या मुंबापुरीत सहकारी कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण केंद्र उभे करू, असेही दरेकर म्हणाले.